
कोल्हापूर:एका बाजूला रुग्ण स्वतः बासुरी वाजवत आहे आणि दुसऱ्या बाजूला रुग्णावर मेंदूची जटील अशी मेंदूची शस्त्रक्रिया पार पाडली जात आहे असे दृश्य सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या संस्कार विभागात पाहायला मिळाले. ज्या रुग्णांच्या मेंदूतील संवेदनशील अशा भाषेच्या अथवा नियंत्रण भागात जर गाट असेल तर रुग्णाची बोलण्याची अथवा नियंत्रक शक्ती नष्ट होवू शकते. अशा वेळी रुग्णाची शस्त्रक्रिया करत असताना रुग्णास जागे ठेवणे अत्यंत गरजेचे असते. या रुग्णाच्या बाबतीत रुग्णाची बासुरी वाजवण्याची क्षमता नष्ट होऊ नये, यासाठी सिद्धगिरी हॉस्पिटलच्या डॉ. शिवशंकर मरजाक्के व त्यांच्या टीमने रुग्णास बासुरी वाजवायला सांगून दुसऱ्या बाजूने शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. अशा प्रकारच्या सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे तब्बल १०२ रुग्णांच्या मेंदूच्या अत्यंत जटील व जोखमीच्या समजल्या जाणाऱ्या अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. मेंदूच्या अशा शस्त्रक्रिया करणारे ग्रामीण भागातील पहिलेच आणि भारतातील मोजक्या रुग्णालयापैकी एक रुग्णालय म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटलने वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. अशा मेंदूच्या आजाराने ग्रस्त अनेक रुग्णांना मुंबई, दिल्ली सारख्या मेट्रो शहरात जाण्याऐवजी कणेरी मठ येथे उपचार मिळू शकतात, तरी रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषेदेत केले.आपण नेहमी विविध शस्त्रक्रियेबद्दल ऐकत असतो, पण मेंदूच्या अनेक विकारांच्यात अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रियेची गरज असते, अशा शस्त्रक्रिया भारतात केवळ मेट्रो सिटीमधील मोजक्याच्या ठिकाणी सर्व उपकरणांसह केली जाते, अन्यथा इतर ठिकाणी हि उपकरणे नसल्यामुळे रुग्णांना गंभीर व कायमची हानी होऊ शकते. अशा शस्त्रक्रिया क्लिष्ट शस्त्रक्रिया असतात त्यामुळे अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया अत्यंत तुरळक प्रमाणात होतात. त्यामुळे एकाच रुग्णालयात अत्यंत कमी कालावधीत तब्बल १०२ शस्त्रक्रिया करण्याची किमया सिद्धगिरी हॉस्पिटलमधील डॉ. शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या कुशल टीमने पार पाडले आहे.अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रियेची भूल देणे व इतर शस्त्रक्रियेसाठी भूल देण्यात महत्वाचा फरक असतो. इतर शस्त्रक्रियेत भूल दिल्यावर रुग्णास कोणत्याच संवेदना होत नाहीत, तो पूर्णपणे बेशुद्ध असतो. पण अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रियेमध्ये भूल देताना केवळ मेंदूच्या प्रमुख भागात भूल देवून केवळ तोच भाग भूलीत केला जातो. अशा शस्त्रक्रियेत रुग्णास बोलते ठेवून, आरामदायक स्थिती शस्त्रक्रिया संपेपर्यंत ठेवावी लागते, हे कौशल्य व कसब केवळ न्युरो भूलतज्ञांच्याकडे असते, सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रकाश भरमगौडर हि जबबदारी गेली १० वर्ष यशस्वी सांभाळत आहेत. याशिवाय शस्त्रक्रिया चालू असताना इतरत्र मेंदूच्या इजा होऊ नये म्हणून सिद्धगिरी येथे उपलब्ध न्युरो मॉनेटरिंग मशीन उपलब्ध आहे. या प्रणालीमुळे मेंदूचा भागाचे नुकसान होऊ न देता शस्त्रक्रिया करणे सुलभ होते.यावेळी बोलताना पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, “फंक्शनल एम.आर.आय., ट्रॅक्टोग्राफी तंत्रज्ञान, न्युरो नेव्हीगेशन मशीन, न्युरो मॉनेटरिंग प्रणाली सह अनुभवी न्युरो शस्त्रक्रिया तज्ञ, अनुभवी न्युरो भूलतज्ञ यांच्या पूर्णतेतून यशस्वी व सर्वोत्तम अशी अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया यशस्वी होवू शकते. या सर्व गोष्ठीसह सिद्धगिरी येथे कुशल डॉक्टर्स व नर्सिंग टीम सतत उपचारांसाठी उपलब्ध असल्यामुळेच ग्रामीण भागात असून हि सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने १०२ अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम केला आहे.यावेळी डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी विविध दृक-श्राव्य (व्हिडीओ) माध्यमांच्या द्वारे सदर जटील व जोखमीची शस्त्रक्रिया कशी केली जाते हे उपस्थित पत्रकारांना दाखवून माहिती विशद केली. यावेळी प्रास्ताविक विवेक सिद्ध यांनी केले तर या पत्रकार परिषदेस सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक व न्युरो भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, ऋतुराज भोसले , दयानंद डोंगरे आदी उपस्थित होते.
Leave a Reply