
कोल्हापूर:राजर्षी शाहू महाराज स्थापित श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील एनबीए मानांकित न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) मधील इन्स्टिटय़ूशन्स इनोव्हेशन कौन्सिलला (आयआयसी) फोर स्टार मानांकन प्राप्त झाले. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना स्टार्टअपमध्ये रूपांतरित होवून नवउद्योजक निर्माण होण्याच्या अनुषंगाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयांतर्गत आयआयसी हा उपक्रम उच्च व तंत्रशिक्षण संस्थांमध्ये राबविला जातो. वर्ष २०२३-२४ मध्ये राबविलेल्या उपक्रमांचा मानांकनासाठी विचार केला गेला. १६ जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिनादिवशी आयोजित उद्यमोत्सव २०२५ मध्ये हे मानांकन बहाल करण्यात आले. एआयसीटीईचे माजी अध्यक्ष डाॅ. अनिल सहस्त्रबुद्धे यांचे व्याख्यान, केंद्र शासनाच्या युक्ती पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या १३ नाविन्यपूर्ण कल्पनांची नोंदणी, प्राध्यापकांचे दोन पेटंट, यापैकी एक युके डिझाईन काॅपीराईट, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम १५ मध्ये नामांकन प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रकल्प, काॅलेजमधील विद्यार्थ्यांचा स्टार्टअप, तंत्रज्ञान; समस्या सोडवणे व नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी उद्योगांशी साधलेला सुसंवाद असे तब्बल ५३ उपक्रम एनआयटीमधील आयआयसीने या वर्षात राबविल्याने हे फोर स्टार मानांकन प्राप्त झाले. देशातील पश्चिम विभागातील एकूण साधारण ५३०० आयआयसीमध्ये अवघ्या १६ आयआयसींना हे फोर स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. यायोगे एनआयटी आयआयसीची इतर शैक्षणिक संस्थांमधील आयआयसींना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक होणार आहे, अशी माहिती एनआयटी संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी दिली. विद्यार्थी व बहुजन समाजाच्या हिताच्या अशा सर्व उपक्रमांसाठी संस्थेचे संपूर्ण पाठबळ राहील, असे सांगत संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी एनआयटीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले. या उपक्रमांसाठी आयआयसी अध्यक्ष प्रा. अश्विनकुमार व्हरांबळे, उपाध्यक्ष प्रा. संग्रामसिंह पाटील, समन्वयक प्रा. वैभव पाटणकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख, कौन्सिल सदस्य, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, रजिस्ट्रार डाॅ. नितीन पाटील, डाॅ. रविंद्र कुंभार आदी उपस्थित होते.
Leave a Reply