समतेच्या इतिहासात माणगावचे स्थान अजरामर :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 

 

माणगाव :माणगाव ता. हातकणंगले ही भूमी क्रांतीची भूमी आहे. येथील दलित बांधवांनी १९२० मध्ये राजर्षी छञपती शाहू महाराज आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत अस्पृश्य परिषद घेतली होती. त्यामुळे देशात समतेचा इतिहास लिहिताना माणगावाच्या योगदानाचा उल्लेख होईल. समतेच्या इतिहासात माणगाव गावाचे स्थान अजरामर राहील, असे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. समतेचा वारसा जपणाऱ्या माणगाव येथील लंडन हाऊस या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला राष्ट्रीय स्मारक दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि या पावनभुमीची महत्ती देशभर पोहचवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पन्हाळा, कोल्हापूर, माणगाव, जयसिंगपूर अशा :गौरवशाली महाराष्ट्र -मंगल कलश यात्रे” दरम्यान डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मंत्री श्री. मुश्रीफ माणगाव येथे आले होते. सरपंच राजू मगदूम यांनी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने मंत्री श्री. मुश्रीफ यांचे स्वागत केले.
मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, त्या काळात स्पृश्य- अस्पृश्यता हा भेदाभेद मोठ्या प्रमाणात होता. दलितांना हीन दर्जाची वागणूक दिली जायची. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण हयातभर असमानता, अन्याय, अत्याचार याविरुद्ध संघर्ष केला. १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. १९४९ साली संविधान स्वीकारले. त्याआधी ३० वर्षांपूर्वीच्या काळात माणगावकरांनी घेतलेली परिषद ही क्रांतिकारक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन येथील स्मारकाला राष्ट्रीय स्मारक दर्जा मिळवून देण्याचा विषय मार्गी लावू, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!