
कोल्हापूर: ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम ), कोल्हापूर चित्पावन संघ , कऱ्हाडे ब्राह्मण संघ तसेच सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने दरवर्षी त्रेतायुगादी दैवत भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव सोहळा आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते . यावर्षीही समाजाच्या वतीने या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती . परंतु काश्मीर पहलगाम येथे आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला . त्यामुळे सध्या संपूर्ण देश आणि देशवासीय दुःखामध्ये आणि आक्रोशात आहेत . या मृत झालेल्या आपल्या बांधवांच्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने आम्ही श्रद्धांजली अर्पण करत आहोत . तसेच केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत की या हल्ल्यातील दोषींवरती त्वरित कडक कारवाई करून मृतांच्या नातेवाईकांना न्याय द्यावा . अशा प्रसंगामध्ये परशुराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त साजरा करण्यात येणारा भव्य कार्यक्रम करणे हे उचित वाटत नाही . म्हणूनच यंदा आम्ही मंगळवार दिनांक २९ रोजी सायंकाळी ५. ३० वाजता भगवान परशुराम आणि छत्रपती शिवरायांचा पालखी सोहळा साधेपणाने करणार आहोत . नेहमी पेटाळा मैदानावरती होणारा कार्यक्रम यावर्षी बिनखांबी गणेश मंदिर येथील मंगलधाम येथे समाज बांधव भगिनींच्या उपस्थितीत साधेपणाने होईल . या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हा ब्राह्मण संघाबरोबरच सारस्वत विकास मंडळ , ब्राह्मण पुरोहित संघ ,परशुराम चषक क्रिकेट स्पर्धा कमिटी, बीबीएफ पालखीमंडळ तसेच वी फॉर अवर्स युवा ग्रुप चे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यरत आहेत . अशी माहिती डॉ . उदय कुलकर्णी , श्रीकांत लिमये , मकरंद करंदीकर , प्रसाद भिडे , धर्मराज पंडित , मिलिंद पावनगडकर , विनिता आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली
Leave a Reply