
कोल्हापूर/ प्रतिनिधी : वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे, त्यासाठी स्वत:पासून सुरुवात करावी. पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा पुढाकार आणि सहभाग महत्वाचा असून प्रदूषण नियंत्रणासाठी रिसायकल आणि रियुजवर भर देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभाग आणि डी. वाय पाटील ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि संधी’ या विषयावरील एक दिवसीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. हॉटेल सयाजी येथे झालेल्या या परिषदेत ‘टेक, मेक, डिस्पोजल आणि पुन्हा मेक’ हा विचार मांडण्यात आला. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी प्रास्ताविकामध्ये परिषद आयोजित करण्यामागील भूमिका विषद केली.
यावेळी बोलताना सिद्धेश कदम म्हणाले, आजची युवा पिढी पर्यावरणासंदर्भातील समस्यांची जाणीव ठेवून नवकल्पनांद्वारे प्रदूषण नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यासाठी कचऱ्याचे पुनर्वापरायोग्य रूपांतरण करून नव्या वस्तू तयार करण्यावर भर दिला पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण करताना आपण दोन पैसे वाचवू शकतो का? याचा विचार गरजेचा आहे. प्रत्येक गोष्टीचा पुनर्वापर होऊ शकतो. त्यामुळे केवळ खरेदी करा वापरा आणि टाका इतकाच मर्यादित विचार न करता यापुढे
कचऱ्यात टाकलेल्या वस्तूचा देखील पुनर्वापर करा. ‘टेक, मेक, डिस्पोजल आणि पुन्हा मेक’ अशा पद्धतीने काम केले तरच प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसू शकेल.
ऋतुराज पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात 21 साखर कारखाने आहेत,हजारो लहान मोठे उद्योग आहेत. इचलकरंजीसारखी कपड्याची बाजारपेठ आहे आणि हा जिल्हा पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या कचऱ्याच्या ९० टक्के रिसायकलिंग होत आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी जिल्ह्यातील विविध घटक काम करत आहे.140 एमएलडी सांडपाण्यापैकी 110 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरात आणले जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने सहकार्य केल्यास भविष्यात कोल्हापूर जिल्हा १०० टक्के प्रदूषण मुक्त जिल्हा म्हणून राज्यात नावलौकिक मिळवेल असा विश्वास ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तांत्रिक सल्लागार नंदकुमार गुरव म्हणाले, प्रत्येक टाकाऊ वस्तूचा पुनर्वापर केला पाहिजे.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणमंडळाच्या वतीने आयोजित परिषदेसाठी डी. वाय. पाटील ग्रुप ने विशेष सहकार्य केल्याबद्दल सिद्धेश कदम यांच्या हस्ते माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा सन्मान देखील करण्यात आला.
या एकदिवसीय परिषदेत ‘फंडामेंटल ऑफ एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट : हेअर अँड सॉलिड वेस्ट’ आणि ‘फंडामेंटल ऑफ वेस्ट वॉटर मॅनेजमेंट’ या दोन विषयांवर आयआयटी बॉम्बेचे टेक्निकल हेड इंद्रकांत झा यांनी विचार मांडले. ‘एन्व्हायरमेंटल इकॉनोमी :अ रिसायकलर्स जर्नी चॅलेंजेस अँड सक्सेस स्टोरी’ या विषयावर टेक्नो वेस्ट मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण कापसे यांनी तर ‘स्ट्रॅटेजी टू कॉम्बॅक्ट क्लायमेट चेंजेस इन महाराष्ट्र’ या विषयावर वातावरणीय बदल विभागाचे संचालक अभिजीत घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. डी. वाय. पाटील अभिवादन विद्यापीठाच्या आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा यांनी ‘एन्व्हायरमेंटल सस्टनेबिलिटी’ बाबत विचार मांडले. ‘टेक्नोग्रीन सोल्युशन्स’ चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय ओझा यांनी पर्यावरण क्षेत्रातील संधी बाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी विविध औद्योगिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, पर्यावरणवादी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी जयवंत हजारे, सहसंचालक रवींद्र आंधळे, सांगलीचे उपविभागीय अधिकारी व्ही. व्ही. किल्लेदार, कोल्हापूरचे उपविभागीय अधिकारी पी.आर. माने, चिपळूणचे उपविभागीय अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, उदय गायकवाड, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के प्रथापन, सीएचआरओ श्रीलेखा साटम, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. जे ए खोत, डॉ. अजित पाटील यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपमधील विविध संस्थांचे प्राचार्य, प्रमुख अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुरेश भुस्कुटे यांनी सूत्रसंचालन केले तर प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी आभार मानले.
Leave a Reply