मुंबई : मराठी रंगभूमीवरची सर्जनशील, बहुमुखी कलावंत मधुगंधा कुलकर्णी आणि निपुण धर्माधिकारी यांचे अनुक्रमे लेखन-दिग्दर्शन आणि स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर यांच्या भूमिका असलेल्या ‘लग्नपंचमी’ला महाराष्ट्रात भरभरून प्रतिसाद मिळाला आणि दोन महिन्यात त्याचे २५ प्रयोग झालेसुद्धा. या रजतमहोत्सवी प्रयोगाच्या निमित्त्ताने मराठी भाषा गौरव दिनी या नाटकाच्या निर्मात्यांनी नाटकाचा ‘वर्ल्ड टूर’ अर्थात परदेश दौरा जाहीर केला असून तो अशाप्रकारचा मराठी नाटकाचा पहिलाच परदेश दौरा असणार आहे.फ्लिक्स प्ले एंटरटेन्मेंट या निर्मिती संस्थेचे यतीन पाटील यां निर्मात्या कंपनीचे यतीन पाटील यांनी या नाटकाच्या आजच्या पंचविसाव्या प्रयोगाच्यावेळी ही घोषणा केली. या नाटकाचा पंचविसावा प्रयोग मराठी भाषा गौरव दिनी रवींद्र नाट्य मंदिर येथे हाउस फुल गर्दीत झाला.या परदेश दौऱ्यात ‘लग्नपंचमी’चे प्रयोग अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया- आणि-न्यूझीलंड, आशिया खंडातील देश, मध्यपूर्व देश तसेच युरोपसह युनायटेड किंग्डम येथे आयोजित करण्यात येणार आहेत. मराठी नाटकाच्या इतिहासात इतक्या व्यापक स्तरावर विविध खंडांमध्ये एकत्रित दौऱ्याची घोषणा होणे ही अभिमानाची बाब आहे. नाटकाचा निर्माता आणि कलाकार स्वप्नील जोशी म्हणाले निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांच्यासाठी आजचा क्षण अत्यंत मोलाचा आहे. “मराठी भाषा गौरव दिनी नाटकाचा पंचविसावा प्रयोग होत आहे, हा नटराजाचा आशीर्वाद आहे आणि सर्वांसाठीच दुग्ध-शर्करा योग आहे. अमृता खानविलकर म्हणाली, “मी इथे अभिनेत्री आहे आणि निर्मातीही आहे. या नाटकाच्या यशाने मला जो आनंद झाला आहे, तो शब्दांत सांगणे कठीण आहे.”नाटकाची लेखिका आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी म्हणाली, “हे नाटक सर्व वयोगटांचे, कुटुंबाचे, विनोदाचे आहे आणि त्याहीवर महत्वाचे म्हणजे ते रसिक प्रेक्षकांचे आहे. या नाटकाला रसिकांकडून एवढा प्रतिसाद मिळेल असे मला ते लिहिताना वाटले नव्हते.या नाटकाचे यश हे आमच्या दिग्दर्शकाप्रमाणे निर्माते, कलाकार यांचेही आहे. पण हे नाटक सर्वात महत्वाचे म्हणजे ते डोक्यावर घेणाऱ्या रसिक प्रेक्षकांचे आहे.
