कोल्हापूर : ऐतिहासिक रंकाळा तलाव संवर्धन आणि सुशोभिकरणाच्या होत असलेल्या विकास कामांमुळे पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरत आहे. नगरविकास मंत्री, सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून रंकाळा तलाव सुशोभीकरणासाठी निधी मंजूर केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडली. सद्यस्थितीत रंकाळा तलावात म्युझिकल फौंऊटेन बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या म्युझिकल फौंऊटेनच्या कामात आणि वापरण्यात येणाऱ्या साहित्यांच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड नको, अशा सक्त सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या. रंकाळा तलाव येथे सुरु असलेल्या कामाची आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत पाहणी केली. कोल्हापूर शहरास भेट देणारा प्रत्येक पर्यटक हा रंकाळा तलावास आवर्जून भेट देतो. यासह शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचे हक्काचे विरंगुळा केंद्र म्हणजे रंकाळा तलाव आहे. या ऐतिहासिक तलावाचे सुशोभिकरण आणि संवर्धन होण्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. कोल्हापूरच्या पर्यटनात भर घालणारा हा एक महत्त्वाचा प्रकल्प असल्याने तो शहराच्या वैभवात भर टाकणारा असावा. म्युझिकल फौंटनचे काम हे जागतिक दर्जाचे आणि दर्जेदारच झाले पाहिजे. त्यात तांत्रिक त्रुटी किंवा निकृष्ट साहित्य वापरले गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.
