कोल्हापूर : न्यू पॅलेस परिसरातील ऋजुता पाटील हिने दहावी मध्ये 100 टक्के गुण मिळवून विशेष यश संपादन केले आहे. संस्कृत व विज्ञान विषयात तिने 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.गणित 99 तर सामाजिक शास्त्र 98 गुण तर इंग्लिश 95 व मराठी मध्ये 92 गुण मिळाले आहेत. बेस्ट ऑफ फाईव्ह नुसार तिला 500 पैकी 492 गुण मिळाले असून भरत नाट्यम नृत्याचे 8 गुण मिळून तिला 500 पैकी 500 गुण मिळाले आहेत.
या यशाचे विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा क्लास, शिकवणी अथवा ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग न लावता स्वअभ्यासाच्या जोरावर तिने हे विशेष यश संपादन केले, दहावीच्या अभ्यासासोबतच भरतनाट्यम नृत्य प्रकारात विशारद पर्यंत ती पोहचली आहे. दहावी सोबत तिने तो नृत्य सराव ही सुरूच ठेवला होता. ऋजुता करवीर तालुक्यातील भुयेवाडी गावची असून ती सध्या न्यू पॅलेस परिसरात वास्तव्यास आहे.*लहानपणापासूनच मी चौफेर व सखोल वाचन करत आले यामुळे भाषा विषय सोपे झाले आणि त्याचा उपयोग गणित व विज्ञान मधील अभ्यासक्रमाचे घटक व्यवस्थितपणे समजून घेण्यास झाला,नियमित व सातत्यपूर्ण पण बोर्ड परीक्षेचा ताण न घेता स्वयंअध्ययनावरती भर दिला.ऋजुताने इयत्ता आठवी मध्ये स्कॉलरशिप मिळवली असून, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदे मध्ये अभिनव उपक्रम करून राज्यस्तरापर्यंत तिने मजल मारली आहे. विज्ञान शाखेत विशेष महत्त्व असणाऱ्या होमी भाभा परीक्षेत देखील ती प्रात्यक्षिक स्तरापर्यंत पोहचली होती. प्राणी कल्याण कार्यक्रमांमध्ये देखील ती सहभाग घेत असते.ऋजुता पाटील श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थी असून तिला शिक्षकांचे व पालकांचे मार्गदर्शन लाभले आहे. विज्ञान शाखा निवडून जैवपशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण आणि संशोधन करण्याचा तिने मानस व्यक्त केला आहे.
