कोल्हापूर हायकर्स तर्फे पवित्र जल संकलन मोहीम

 

कोल्हापूर: अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने, युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ५ व ६ जून २०२६ रोजी दुर्गराज रायगड येथे ३५२वा शिवराज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात संपन्न होत आहे.या पवित्र आणि ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त कोल्हापूर हायकर्स तर्फे “पवित्र जल संकलन मोहीम – २०२६” राबविण्यात आली आहे. सह्याद्री पर्वतरांगांतील ऐतिहासिक, धार्मिक व स्वराज्याशी निगडित पवित्र स्थळांपासून ते हिमालयातील देवभूमी उत्तराखंडमधील सीमावर्ती कैलास दर्शनभूमीपर्यंत ही मोहीम पार पडली आहे.सन २०१२ मध्ये कोल्हापूर हायकर्सच्या वतीने युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज यांच्यासमोर “पवित्र जल संकलन” ही संकल्पना मांडण्यात आली. त्याच क्षणापासून या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात झाली.
गेल्या १४ वर्षांपासून कोल्हापूर हायकर्सचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांनी विस्तारलेल्या स्वराज्याच्या भूमीवरून, सह्याद्रीतील गडकोट, सप्तसिंधू नद्या, हिमशिखरे, हिमालयातील पवित्र स्थळे तसेच देशभरातील ऐतिहासिक व आध्यात्मिक स्थळांवरून पवित्र जल संकलित करत आहेत.या सातत्यपूर्ण शिवकार्याची दखल घेत, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने तसेच युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली “पवित्र जल संकलन” करण्याचा अधिकृत मान कोल्हापूर हायकर्स संस्थेला कायमस्वरूपी प्रदान करण्यात आला आहे.यावर्षीचे हे पवित्र जल संकलन मोहिमेचे १५ वे वर्ष असून, स्वराज्य, श्रद्धा, इतिहास आणि राष्ट्रभक्ती यांचा अद्वितीय संगम या मोहिमेत अनुभवायला मिळत आहे.या मोहिमेद्वारे स्वराज्याच्या ऐतिहासिक परंपरेचे जतन, पवित्र नद्या व जलस्रोतांविषयी जनजागृती, पर्यावरण संरक्षण व जलसंवर्धनाचा संदेश, इतिहास, अध्यात्म आणि निसर्गाचा सन्मान हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.अशी माहिती कोल्हापूर हायकर्सचे संस्थापक अध्यक्ष सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी अध्यक्ष फत्तेसिंह सावंत,कोल्हापूर हायकर्सचे सदस्य विजय ससे, अविनाश भाले, इंद्रजीत मोरे,अमरसिंह शिंदे, विष्णू सूर्यवंशी, अतुल सुतार, श्रेयस ढवळे,सचिन भाट, डॉ. राजेंद्र भस्मे,अक्षय पाटील,सत्यजित माने, सौरभ साळीकर सो. श्रावणी पाटील सो. संघवी राजवर्धनआदी शिवप्रेमी व मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed.

error: Content is protected !!