कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कोल्हापूर शहरातील १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झाले. कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ करणे गरजेचे असून त्यादृष्टीने हद्दीबाहेरील लोकांच्या अडीअडचणी शंभर टक्के सोडविण्यात येतील, असे सांगून कोल्हापूर शहराला अधिक सुनियोजित करण्यासाठी टप्प्या-टप्प्याने आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण विभाग, कोल्हापूर महानगरपालिका व महाराष्ट्र पोलीस यांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम प्रायव्हेट हायस्कूलच्या पटांगणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आरोग्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास राज्यमंत्री व कोल्हापूरच्या सह पालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, राहुल आवाडे, शिवाजी पाटील, अशोकराव माने, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, पोलीस अधीक्षक निलोत्पाल, उपमहापौर अक्षय जरग उपस्थित होते.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे संपूर्ण महाराष्ट्राचा मानबिंदू आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या देदिप्यमान नाट्य परंपरेमध्ये या नाट्यगृहाचा फार मोठा इतिहास आहे. कोल्हापूरकरांचे प्रचंड प्रेम असलेल्या या नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणासाठी राज्य सरकारने २५ कोटी रुपये तात्काळ दिले. या नाट्यगृहाचे पुनर्निर्माण आधीचेच बाह्यस्वरुप जतन करत वारसामूल्य जपून अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे.आई महालक्ष्मी अंबाबाईंच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. या मंदीर परिसराच्या विकासाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले असून निश्चित वेळेत ते काम पूर्ण करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच आले असून त्यासाठी शेंडा पार्क येथे ७५ एकर जागा दिली आहे. या न्यायालयामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक येणार आहेत. शेंडा पार्क येथे आयटी पार्क, कन्व्हेन्शन सेंटर ठिकाणी करतो आहोत या सर्व बाबींमुळे कोल्हापूरच्या विकासाला गती मिळणार असून त्यासाठी शहराच्या हद्दवाढीची गरज आहे. नव्याने हद्दवाढी मध्ये समावेशित कराव्या लागणाऱ्या नागरिकांच्या सर्व अडचणी शंभर टक्के सोडविण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सीपीआर म्हणजेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वारसा स्वरुप जतन करून चांगल्या प्रकारे पुनुरूज्जीवन करण्यात आले आहे, असे सांगून ते म्हणाले, येथे ८ मॉड्युलर थिएटर्स असलेल्या ऑपरेशन थिएटर्सचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. चांगला मॉड्युलर बर्न वॉर्ड तयार झालेला आहे. ३० मॉड्युलर बेडचा अपघात विभाग, डायलिसिसची सुविधा आदी अनेक गोष्टींमुळे कोल्हापूरच्या आरोग्य सेवेमध्ये गुणात्मक बदल होत आहे. आता शेंडा पार्कमध्ये देखील ६०० बेड सर्वोपचार रुग्णालय करण्यात येणार असून २५० बेड कर्करोग रुग्णालय आणि २५० बेडच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा यात समावेश आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये ज्याप्रमाणे सर्वात चांगली आरोग्याची व्यवस्था ही कोल्हापूरला उभी झाली होती, त्याचकडे आता पुन्हा कोल्हापूरने वाटचाल सुरू केलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.
आपल्यासाठी २४ तास काम करणाऱ्या पोलीसांसाठी चांगल्या प्रकारची घरे असावित ही भूमिका घेऊन राज्य सरकार काम करत असून महाराष्ट्रामध्ये पोलिसांकरता ५० हजार घरांचे नियोजन केले आहे. कोल्हापूर येथील पोलीसांसाठी घराची १७ मजली सुंदर इमारत तयार झाली आहे. जवळपास २०४ सदनिका महाराणी ताराराणी पोलीस गृहसंकुलात तर इचलकरंजीमध्ये २१० सदनिका अशा जवळपास ४१४ सदनिका पोलिसांकरता आज या जिल्ह्यामध्ये आपण उपलब्ध करून दिल्या आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूर हे कुस्तीचे माहेरघर आहे. मात्र, फुटबॉल, हॉकी आणि क्रिकेट खेळाचे प्रेमीही येथे आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेतून व महानगरपालिकेच्या निधीतून 6 कोटी 96 लाख रुपयातून मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऍस्ट्रोटर्फ मैदान विकसित केले आहे. राज्य व आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील हॉकीच्या स्पर्धा कोल्हापुरात घेता येईल. तसेच कोल्हापूरला क्रिकेटचे स्टेडियम बांधण्याकरता जागा उपलब्ध करून दिली आहे. स्टेडियमसाठी बीसीसीआयला विनंती केली असून त्या माध्यमातून देशातील आधुनिक अशा प्रकारचे उत्तम दर्जाचे क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येईल. फुटबॉल खेळासाठीही आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील.
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे लोकांचा आक्रोश आणि नुकसान आम्ही पाहिला असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यावर मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या साह्याने पुराच्या पाण्यावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र रेझिलिएन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) तयार केला. यापूर्वी रखडलेल्या या प्रकल्पाला पुन्हा या सरकारने ‘मित्रा’च्या (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन) माध्यमातून मान्यता मिळवली असून केवळ कोल्हापूर आणि सांगली शहरच नव्हे तर या भागातील संपूर्ण पाणलोट क्षेत्रावर पूरनियंत्रणाच्या दृष्टीने काम करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत पुराचे वाहून जाणारे अतिरिक्त पाण्यापैकी सुमारे ३५ ते ४० टीएमसी पाणी आता डायव्हर्शन कॅनलने पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांना आणि पुढे उजनी धरणात आणि पुढे मराठवाड्यामध्ये नेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे समाधी स्थळ, मेजर ध्यानचंद स्टेडियमवर एस्ट्रोटर्फ, रंकाळा तलावतील संगीत कारंजे, अंबाबाई मंदिर परिसरात बहुमजली पार्किंग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एमआरडीपी अंतर्गत 484 कोटींचे रस्ते व नागरी सुविधा, मेकॅनिकल पार्किंग यासह विविध कामांचे लोकार्पणही या कार्यक्रमांमध्ये झाले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनातून जिल्ह्याला नवी दिशा व सांस्कृतिक, क्रीडा, पर्यटन व नागरिक सुविधांना बळकटी मिळेल. सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कला वैभवाची समृद्ध परंपरा असलेल्या करवीर नगरीतील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीमुळे अमूल्य सांस्कृतिक ठेव्याचे नव्याने जतन संवर्धन आणि पुनरुज्जीवन होत आहे. हा क्षण सर्वांसाठी अभिमानाचा आणि समाधानाचा आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले 136 व्या जयंतीनिमित्त हे नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभे राहिले आहे. हा क्षण केवळ पुनर्बांधणीचाच क्षण नाही तर हा महाराष्ट्र आणि कोल्हापूरच्या समृद्धीचा पुनर्जन्म सोहळा आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, कोल्हापूर बदलत आहे. अनेक वर्षांची स्वप्न साकार करणारे एकापेक्षा एक चांगले निर्णय होत आहेत. दीड- दोन महिन्यापूर्वी महालक्ष्मीच्या आराखड्याला मान्यता मिळाली आणि त्यानंतरच्या कामाचा शुभारंभ झाला. या शुभारंभाच्या बरोबर अनेक विकासकामांच्या उद्घाटनाची सुरुवातही झाली आहे. सीपीआरच्या माध्यमातून लोकांना आरोग्याच्या दर्जेदार वैद्यकीय सेवांबरोबरच वैद्यकीय शिक्षणामध्ये सुद्धा कोल्हापूरचे नाव महाराष्ट्रात अग्रेसर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भस्मस्थानी पडल्यानंतर निधीसाठी सातत्याने पाठपुरवा केल्याचे सांगून लवकरच डीपी आणि ट्रान्सफॉर्मर कामांसाठीही निधी उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरची नवी ओळख बनत आहे. आयटी सेंटरसाठी ८० एकर जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे नवीन पिढीसाठी प्रचंड मोठे काम उभे राहत आहे. कोल्हापूरच्या विकासाची खूप मोठी गरज, खूप मोठी आवश्यकता आणि खूप मोठी भूक आम्हा सगळ्यांची आहे. सन 1939 ला आणखी कुठे नव्हते त्यावेळेला राजाराम महाराजांनी विमानतळाची सुरुवात इथे केली. पण आज पुणे फार पुढे गेले आहे. बेळगावला सुद्धा कोल्हापूरपेक्षा चांगल्या पद्धतीचे फ्लाईट्स आहेत. कोल्हापूर येथे आता मोठे एअरबस यायला हवेत. १७०० मीटरचा रनवे २३०० मीटरचा करण्यासाठी आवश्यक परवानगी द्यावी. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या निमित्ताने व सर्कीट बेंचच्या निमित्ताने भविष्यकाळामध्ये येणाऱ्या आयटी सेंटरच्या माध्यमातून कोल्हापूरची गरज, कोल्हापूरची ओळख आणि कोल्हापूरचे महत्व वाढणार आहे. या ठिकाणी हजारो लोक दररोज येणार आहेत. फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढत जाणार आहे. त्यासाठी रस्ते व अन्य दळणवळण्याच्या सुविधा दर्जेदार असणे आवश्यक आहे, असे सांगून प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये सर्व अद्ययावत वैद्यकीय सुविधा आणलेल्या आहेत. शेंडा पार्कमध्ये अमेरिकेच्या ‘ह्यूस्टन’ शहराच्या धर्तीवर मेडिकल हब बनविण्यात येत आहे. एक-दोन वर्षांनी कोल्हापूर शहर, कर्नाटक आणि आपल्या कोकणातील कुठल्याही माणसाला वैद्यकीय उपचारांसाठी मुंबई आणि पुण्याला जावे लागणार नाही, अशी व्यवस्था उभारण्यात येईल. यासाठी जवळपास ४७३ कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला आहे. शेंडा पार्कमध्ये ६०० बेडचे सामान्य, २५० बेडचे कॅन्सर आणि २५० बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल साकारत आहे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, सीपीआर इमारतीप्रमाणे ७४ हेरिटेज इमारती कोल्हापूरमध्ये आहेत. तसेच अनेक मोठे तलाव यामध्ये रंकाळा, कळंबा, राजाराम तलाव, कोटितीर्थ, हनुमान तलाव असे अनेक तलाव छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी दिलेले आहेत. शासनाच्या वतीने या सर्व गोष्टींचे जतन व संवर्धन करत, पर्यटन वाढीसाठी कोल्हापूरला ‘हेरिटेज सिटी’ घोषित करावी. ‘हेरिटेज संवर्धन प्लॅन’ (Heritage Conservation Plan) अंतर्गत भरीव निधीची तरतूद करून देशामध्ये कोल्हापूरचा एक नाव लौकिक वाढवावा, अशी विनंती केली. कोल्हापूरची रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब आहे. कोल्हापूरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकची समस्या आहे. कोल्हापूरमध्ये अंडरपास, ओव्हरब्रिज, त्याचबरोबर सिमेंट काँक्रीटचे रोड, कोल्हापूरची हद्दवाढ या गोष्टी अत्यंत होणे गरजेचे आहे. कोल्हापूरमध्ये आज ५० लाख भाविक येत असताना प्रचंड मोठी वाहतुकीची कोंडी आहे, असे सांगून शहराच्या हद्दवाढीची आवश्यकता व्यक्त केली.
श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा करत असताना जर आपण ते १० मीटरवर ॲक्वीझिशन आणले तर ६०० कोटी रुपये वाचतील. तसेच शिवाजी स्टेडियमपर्यंत अंडरग्राउंड रस्ता, शिवाजी स्टेडियमपासून शाहू मिलपर्यंत अंडरग्राउंड रस्ता आणि शाहू मिलपासून ओव्हरब्रिजने युनिव्हर्सिटी जवळ ब्रिज काढल्यास शहरातलं ट्रॅफिक पूर्ण संपून जाईल आणि कोल्हापूर शहर हे या महाराष्ट्रातील एक चांगलं शहर म्हणून उदयास येईल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर रुपाराणी निकम यांनी केले आभार महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी मानले. यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, कृष्णराज महाडिक, जयंत पाटील, विशाल शिराळे, समित कदम विजय जाधव, यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
