समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर व्यापक चर्चा

 

नवी दिल्ली : भारतातील घटता एकूण प्रजनन दर (TFR), वाढती वंध्यत्वाची समस्या आणि त्यातून भविष्यात निर्माण होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांवर व्यापक आणि दीर्घकालीन विचार करण्याच्या उद्देशाने समृद्ध मातृत्व अभियानाच्या वतीने ५ व ६ ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावरील विचारमंथन आयोजित करण्यात आले.भारताचा एकूण प्रजनन दर १.८ पर्यंत घसरला असून, लोकसंख्येच्या स्थिर पुनरुत्पादनासाठी आवश्यक असलेल्या २.१ या प्रतिस्थापन पातळीपेक्षा तो कमी आहे. महाराष्ट्राचा प्रजनन दर तर १.४ इतका खाली आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह कमी प्रजनन दर असलेल्या राज्यांमध्ये भविष्यातील कार्यक्षम वयोगटातील लोकसंख्या, वृद्धांची वाढती संख्या, आरोग्य व्यवस्था, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक विकास यावर होणाऱ्या परिणामांचा वेळीच अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामुळे बदलती लोकसंख्या रचना हा केवळ लोकसंख्येचा विषय नसून देशाच्या दीर्घकालीन आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक आणि राष्ट्रीय क्षमतेशी संबंधित विषय आहे.घटत्या प्रजनन दरासोबतच वंध्यत्वाची समस्या देखील गंभीरपणे समोर येत आहे. वाढते वय, शहरीकरण, बदलती जीवनशैली, ताणतणाव, लठ्ठपणा, मधुमेह, महिलांमधील PCOS व एंडोमेट्रिओसिस, पुरुष प्रजनन क्षमता तसेच पर्यावरणीय प्रदूषण, कीटकनाशके आणि इतर रासायनिक घटकांचा प्रजनन आरोग्यावर होणारा परिणाम यांचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.

समृद्ध मातृत्व अभियानाच्या वतीने प्रजनन आरोग्य आणि वंध्यत्व उपचार अधिक सुलभ, परवडणारे आणि गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व जिल्हा रुग्णालयांमध्ये टप्प्याटप्प्याने IVF, IUI आणि इतर प्रजनन उपचार सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल दाम्पत्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा विचार व्हावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.

या संदर्भात डॉ. वर्षा पाटील म्हणाल्या, भारताची तरुण लोकसंख्या ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. बदलत्या लोकसंख्याशास्त्रीय परिस्थितीकडे भीती किंवा चिंतेच्या दृष्टीने न पाहता, भविष्यासाठी योग्य नियोजन करण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे. वैज्ञानिक संशोधन, विश्वसनीय आकडेवारी, व्यापक जनसंवाद आणि दूरदृष्टीपूर्ण धोरणांच्या माध्यमातून भारत आपली लोकसंख्याशास्त्रीय ताकद पुढील अनेक दशकांपर्यंत टिकवून ठेवू शकतो.

यावेळी पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी केंद्रीय आयुष मंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संबंधित मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या धर्मपत्नी व भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षा डॉ. मल्लिका नड्डाजी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार श्री. जगदीश शेट्टर बिहारचे खासदार सुधाकर सिंह,पश्चिम बंगालचे खासदार डॉ. जयंत रॉय, राज्यसभा सदस्य खासदार धनंजय महाडिक ,राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अजित गोपचड तसेच समृद्ध मातृत्व अभियानाच्या प्रमुख डॉ. वर्षा पाटीलजी*यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

 

Comments are closed.

error: Content is protected !!