कोल्हापूर/ प्रतिनिधी: स्मशान भूमीच्या लाकूड चोरीच्या आरोपावरून निरमा कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार सुशांत पवार यांच्यावर अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. पण मी त्या कंपनीचा ठेकेदार नाही तर त्या कंपनीने कोल्हापुरात मला काही अधिकार दिल्याचे सुशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. महापालिकेची प्रभाग क्रमांक १२ महालक्ष्मी मंदिर येथून माझ्या पत्नीने २०२६ ची अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. याच्याच रागातून आणि सूडबुद्धीने मला आणि कंपनीला बदनाम केलं जात आहे.यात कंपनीचीही मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे.असेही सुशांत पवार यांनी यावेळी सांगितले.
या विरोधात दोन दिवसापूर्वी कोर्टात अर्ज दाखल केला असल्याचेही त्यांनी सांगितले. झाड पडल्याने तेथील लाकूड उचलून नेण्यास विलंब झाला. पण अज्ञात व्यक्तीने ते ट्रॉलीमध्ये लाकूड भरून विकले. याबाबत कंपनीने या विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केलेली आहे. तरीही राजकीय हेतूने महापालिका गटनेते आदिल फरास यांनी माझ्यावर आरोप केलेले आहेत. तर काहींनी निरमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केलेली आहे. पण महापालिका सभेत याबाबतचा कोणताही ठराव झालेला नाही. किंवा असा प्रकार घडलेला नाही. हे माझ्या विरोधात षडयंत्र आहे. माझे नाव खराब करण्याचा प्रयत्न आहे. पुढील लढा हा न्यायालयीन मार्गाने लढणार असून तुमच्याकडे काही पुरावे असल्यास ते समोर आणावेत. तसेच सर्व गोष्टींची प्रशासकीय स्तरावर सखोल चौकशी करावी अशी मागणी सुशांत पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
