एनआयटीच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय कार्यक्रमात विशेष सत्कार

 

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त कोल्हापूर येथे राज्यस्तरीय ‘रेड रन’, ‘रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धा’ तसेच राज्यस्तरीय ‘इंटेन्सिफाइड IEC कॅम्पेन’च्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. राज्याच्या आरोग्य सेवेचे (शहरी) आयुक्त तथा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे (IAS) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

नॅको, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुरू करण्यात आलेल्या ‘इंटेन्सिफाइड IEC कॅम्पेन’च्या माध्यमातून राज्यभर एचआयव्ही/एड्सविषयी व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत गावपातळीवर, शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच विविध समुदायांमध्ये एचआयव्ही/एड्सविषयी संवेदनशीलता निर्माण करणाऱ्या कार्यशाळा आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुनील भोकरे यांनी दिली.

या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोल्हापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो)च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. ‘रेड रन’, फ्लॅश मॉब, लेझीम-हलगी पथक तसेच वाहतूक व्यवस्थापन अशा विविध विभागांत विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

या उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत डॉ. सुनील भोकरे यांच्या हस्ते न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या रासेयो विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीने रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री. अमोल कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या उपक्रमासाठी न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. संजय दाभोळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच NITच्या ट्रान्सपोर्टेशन विभागाने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.राज्यस्तरीय आरोग्य जनजागृती उपक्रमात NIT कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी केलेला सक्रिय सहभाग सामाजिक बांधिलकी आणि युवा शक्तीचे प्रभावी उदाहरण ठरल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

Comments are closed.

error: Content is protected !!