कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजतर्फे कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटला ‘प्रोजेक्ट नेफ्रोकेअर’ अंतर्गत सुमारे ६३ लाख रुपये किमतीची अत्याधुनिक वैद्यकीय नेफ्रोकेअर उपकरणे हस्तांतरित करण्यात आली. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थितीत रोटरी इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन डॉ. लेनी डिकोस्टा यांच्या हस्ते ही उपकरणे हस्तांतरित करण्यात आली.रोटरी फाउंडेशन ग्लोबल ग्रँट अंतर्गत देण्यात आलेल्या या उपकरणांमध्ये सीआरआरटी मशीन, मल्टीपॅरा मॉनिटर, सिरिंज पंप, इन्फ्युजन पंप आणि डायलिसिस बेड यांचा समावेश आहे. गंभीर अवस्थेतील मूत्रपिंड विकारांच्या गरजू रुग्णांवर उपचार करताना या उपकरणांचा मोठा फायदा होणार असून, नेफ्रोलॉजी विभागातील रुग्णसेवा अधिक सक्षम होणार आहे.रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे अध्यक्ष रो. योगेश रास्ते म्हणाले, समाजसेवेच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे हे रोटरीचे ध्येय आहे. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे कार्य अतिशय कौतुकास्पद असून त्यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळावेत हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. रोटरी आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या एकत्रित प्रयत्नांतून भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल.
हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागप्रमुख डॉ. सुषमा जोतकर म्हणाल्या, रोटरीच्या सहकार्यातून उपलब्ध झालेल्या या अत्याधुनिक उपकरणांमुळे गंभीर रुग्णाना दिलासा मिळेल. एकाच वेळी अनेक अवयवांच्या विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ही उपकरणे विशेष उपयुक्त ठरणार आहेत.
रोटरीयन राहुल कुलकर्णी म्हणाले, रोटरी आणि डी. वाय. पाटील संस्थेचे अनेक वर्षांपासून सहकार्याचे संबंध आहेत. यापूर्वी शिशु रक्षा, स्पाइन केअर, तसेच रक्ताच्या आजारांवरील उपचारांसाठी सहाय्य करण्यात आले. या सुविधांचा डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये चांगल्या पद्धतीने वापर होत असून, यापुढेही रुग्णांच्या हितासाठी हे सहकार्य कायम राहील.
कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांनी रोटरीच्या या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. रोटरीने उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक सुविधांचा समाजातील गरजू रुग्णांना जास्तीत जास्त फायदा मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करू.
रोटेरियन अरुण भंडारे यांनी रोटरीच्या माध्यमातून आरोग्यसेवा अधिक भक्कम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. अत्याधुनिक उपकरणांमुळे रुग्णांना उत्तम सुविधा उपलब्ध होऊन आरोग्यसेवेची गुणवत्ता अधिक उंचावण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. आर. जे. ख्यालप्पा, उप-अधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, रोटेरियन अरुण भंडारे, रो. विजय कुलकर्णी, रो. चेतन एस. भोकरे यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार डॉ. अभिजित कोराणे यांनी मानले.
