शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; आमदार कौस्तुभ गावडे 

 

कोतोली : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून भरघोस मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्र विधान परिषदेतील नवनिर्वाचित आणि देशातील सर्वात तरुण शिक्षक आमदार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांचा श्रीपतराव चौगुले महाविद्यालय, कोतोली येथे जाहीर सत्कार करण्यात आला. ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित या सत्कार सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाला ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. के. एस. चौगुले, संस्थेचे सचिव शिवाजी पाटील, संस्थेचे संचालक मा. अजय चौगुले, श्री. मुरलीधर गावडे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. रवींद्र चौगुले, प्रा. आर. बी. पाटील, प्रा. करणसिंह सरनोबत, कॉलेज विकास समिती सदस्य माजी प्राचार्य डॉ. जे. के .पवार सर, शहाजी कुदळे, सागर वर्पे, बबन चौगुले,संचालिका डॉ. वेदिका चौगुले, खजानीस एम. एस .चौगुले साहेब, सिनेट सदस्या डॉ. उषा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते आमदार कौस्तुभ गावडे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना आमदार कौस्तुभ गावडे यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीविषयी मनोगत व्यक्त केले. शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची जाण, शिक्षकांच्या अडचणींची जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची बांधिलकी या बाबी आपल्या कार्याच्या केंद्रस्थानी राहतील, असे त्यांनी सांगितले. शैक्षणिक संस्थांचे प्रश्न, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिक्षण व्यवस्थेतील सकारात्मक बदल यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

 

Comments are closed.

error: Content is protected !!