नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी ‘ललित २०५’ही मालिका ६ ऑस्टपासून स्टार प्रवाहवर सुरु झालीय. या मालिकेत संग्राम समेळ नील राजाध्यक्ष ही भूमिका साकारतोय. याच निमित्ताने संग्रामशी केलेली ही खास बातचित.
- ‘ललित २०५’चं वेगळेपण काय सांगशील?
– इतर कौटुंबिक मालिकांपेक्षा ही नक्कीच एक वेगळी मालिका आहे. एकत्र कुटुंबाची गोष्ट यात पाहायला मिळणार आहे. आजी आणि नातवाचं वेगळं नातं या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येईल. या मालिकेत मी नातवाची भूमिका साकारतो आहे. आजवरच्या भूमिकांपेक्षा ही पूर्णपणे वेगळी भूमिका आहे. नीलची स्वत:ची अशी मतं आहेत. त्यामुळेच ‘ललित २०५’ ही मालिका माझ्यासाठी स्पेशल आहे.
- या मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाहशी तू जोडला गेला आहेस त्याविषयी काय वाटतं?
- स्टार प्रवाहचं आणि माझं खूप जुनं नातं आहे. मन उधाण वाऱ्याचे या मालिकेच्या निमित्ताने मी या परिवाराशी जोडला गेलो. ‘ललित २०५’च्या निमित्ताने हे नातं अधिक घट्ट झालंय.श्रावणी देवधर आणि सगळीच क्रिएटिव्ह टीम यांनी माझ्यावर जो काही विश्वास टाकलाय,त्यामुळे मला काम करायला खूप मजा येते.एखाद्या कलाकाराला आणखी काय हवं असतं? त्यामुळे मी खूप खुश आहे.
- ‘ललित २०५’ मध्ये सुहास जोशींसोबतच अनेक अनुभवी कलाकार मंडळी आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
- खुपच छान. मालिकेची टीम चांगली असली की त्याचं प्रतिबिंब आपसुकच मालिकेत दिसतं. पहिल्या दिवसापासूनच आमची छान गट्टी जमलीय. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आम्ही ठरवून एकत्र करतो. आम्हाला एकत्र ठेवण्यात सुहासताईंची महत्त्वाची भूमिका आहे. त्या आम्हा सर्वांचीच खूप काळजी घेतात. फावल्या वेळात आम्ही खूप गप्पाही मारतो. सीनमधल्या महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चाही करतो. त्यामुळे या मालिकेच्या निमित्ताने मला एक छान हसतं खेळतं कुटुंब लाभलंय असंच म्हणायला हवं. यासाठी मी स्टार प्रवाह आणि सोहम प्रोडक्शन्सचा कायम ऋणी राहीन.
- या मालिकेसाठी खास ठाण्यात सेट उभारण्यात आलाय त्याविषयी…
- ‘ललित २०५’चा सेट म्हणजे खऱ्या अर्थाने नंदनवन आहे. बारीक-सारीक गोष्टींचा विचार करुन हा सेट उभारण्यात आलाय. राजाध्यक्ष फॅमिलीचा पैठणीचा व्यवसाय आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन सेटसाठी पैठणीचा वापर करण्यात आलाय. घराचे पडदेही साडीपासून बनवण्यात आले आहेत. या वास्तूत प्रवेश करताच आपसुकच सकारात्मक ऊर्जा मिळते.
Leave a Reply