
.कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर अनेक नाट्यमय घडामोडी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. सरिता नंदकुमार मोरे या महापौर विराजमान झाल्या. कोल्हापूर महापालिकेच्या या ४७ व्या महापौर आहेत.
दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सात नगरसेवक यांचे पद धोक्यात आहे असे सांगितले होते.पण ताराराणी भाजप आघाडीला धक्का देत राष्ट्रवादी व काँग्रेस चे महापालिका आणि उपमहापौर यांचीच निवड करण्यात आली. मुश्रीफ आणि बंटी पाटील यांची राजकीय खेळी मुळेच हे शक्य झाले. प्रत्यक्षात फक्त नगरसेविका अश्विनी रामाणे यांचे जात प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे पद रद्द करण्यात आले. याचबरोबर अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजादे याचे पद याआधीच रद्द करण्यात आले होते. यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता आले नाही.
महापौर पदासाठी भाजप ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. यापैकी जयश्री जाधव यांना 33 मते आणि सरिता मोरे यांना 41 मते मिळाली.याचप्रमाणे राजकीय बलाबल उपमहापौर निवड प्रक्रियेत राहिले आणि काँग्रेसचे नगरसेवक भूपाल शेटे हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४४ व्या उपमहापौर पदी विजयी झाले.यावेळी कमलाकर भोपळे यांना ३३ तर भूपाल शेटे यांना ४४ मते मिळाली. महानगरपालिका सभागृहात पंधरा मिनिटे अर्ज मागे घेण्यासाठी वेळ दिला गेला. पण कोणीही माघार घेतली नाही.
या निवडणुक प्रक्रियेत शिवसेनेचे ४ नगरसेवक राहुल चव्हाण, प्रतीज्ञा निल्ले, रियाज खान, अभिजित चव्हाण गैरहजर राहिले.महानगरपालिका महापौर पद हे खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला होता. या नियमानुसार ही निवड झाली.कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न यामध्ये कचरा उठाव,महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र आराखडा, पार्किंग, थेट पाईपलाईन आदी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापौर आणि उपमहापौर यांनी सांगितले.यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
Leave a Reply