
कोल्हापूर :डिसेंम्बर अखेर कर्जत येथील एन. डी.स्टुडिओ मध्ये होणाऱ्या कला प्रदर्शनात कोल्हापूरच्या कलाकृतींना सहभागी करून घेणार असल्याचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी सांगितले. एन. डी. स्टुडिओ मध्ये लाखो लोक या प्रदर्शनास भेट देतात. यात चित्रपट कलावंतांचाही मोठा सहभाग असतो. यामुळे कोल्हापूरच्या कलेची व्याप्ती वाढून ती भारतात तसेच भारताबाहेर पोहचेल असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर आर्ट फौंडेशन या स्थानिक कलावंताना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या कला संस्थेतर्फे कोल्हापूरात तिसऱ्या कला महोत्सवाचे आयोजन दसरा चौकात भव्य कलामंडपात केले आहे. सुमारे शंभर हून अधिक चित्रकार, शिल्पकारांच्या कलाकृती या कला महोत्सवात प्रदर्शन आणि विक्रीसाठी मांडण्यात आली आहेत. या कला महोत्सवाचे उद्घाटन आज नितीन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
आधुनिक काळात आपल्या कोल्हापूरची कला नव्या वळणावर उभी आहे. कलाक्षेत्रात नवे प्रयोग, संदर्भ, विचार एकमेकांना पुरक ठरावेत आणि यातून कोल्हापूर कलाक्षेत्र आधिकाधिक लोकाभिमुख व्हावे, स्थानिक कलावंताच्या कलाकृतीना बाजारपेठ मिळावी हा प्रयत्न या कोल्हापूरच्या कलामहोत्सवाच्या आयोजनाचे मुख्य प्रयोजन आहे असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. यावेळी महापौर सरिता मोरे,उपमहापौर भूपाल शेटे यांच्यासह अजय दळवी, प्रशांत जाधव, विजय टिपूगडे, संजय देसाई, संपत नायकवडी डी. डी. पाटील,संजीव संकपाळ, एस. निंबाळकर, अस्मिता जगताप आदी उपस्थित होते.प्रास्तविक महादेव नरके यांनी केले.
या कला मंडपात चित्रकार शिल्पकारांचे 100 स्टॉल्स सोबत कला साहित्याचे स्टॉल्स, अस्सल कोल्हापूर खाद्याचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. कलानगरीतील 5000 हून अधिक कलाकृती रु.500 ते रु.25 लाखापर्यंतच्या रक्कमेत विकत घेता येतील. एकूण 5 दिवस चालणाया या कलामहोत्सवात सकाळच्या सत्रात कलावंतांची चित्र-शिल्प प्रात्यक्षिक व सायंकाळच्या सत्रात मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. रविवारी सकाळी बालकुमार चित्रकला स्पर्धा व कलामहोत्सवांची क्षणचित्राची छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी या कला महोत्सवाचा आनंद कलारसिकांना घेवून कलानगरीच्या कलाकृती विकत घेण्याचे आवाहन समन्वयक प्रशांत जाधव व अजय दळवी यांनी केले आहे.
Leave a Reply