

हा पुरस्कार स्विकारताना डॉ.सायरस पूनावाला म्हणाले की, गेली 5 दशके सिरम इन्स्टिट्युटने केलेल्या मानवतावादी कार्याची दखल घेतल्याबद्दल आम्ही ऋणी आहोत व हा पुरस्कार सिरम इन्स्टिट्युच्या वतीने मी नम्रपणे स्विकारतो. यामुळेच मला आणि माझ्याबरोबर काम करणार्या माझ्या सहकार्यांना हे मानवतावादी काम पुढेही चालू ठेवण्यास बळ मिळेल.तसेच गावी आणि जगभरातील संयुक्त राष्ट्रांच्या इतर संस्थांमार्फत किफायतशीर दरात लसी उपलब्ध करून देण्यात मदत होईल. त्यामध्ये विशेष करून न्यूमोनिया,अतिसार,मेंदूज्वर,एचपीव्ही व डेंग्यु यांसारख्या आजारांसाठी असलेल्या नवीन लसींचा समावेश आहे.
सिरम इन्स्टिट्युटची स्थापना डॉ.सायरस पूनावाला यांनी 1966 मध्ये केली आणि ही कंपनी आता जगात सर्वांत जास्त लसींचे उत्पादन करते.सिरम तर्फे जगभरातील 170 देशांमधील लहान मुलांना दरवर्षी एक अब्जांहून अधिक लसींच्या डोसेसचा स्वस्त दरात पुरवठा केला जातो.
गावी तर्फे दिल्या जाणार्या लसींपैकी 40 टक्के लसी या सिरम तर्फे पुरविल्या जातात. 2016-2020 या कालावधीमध्ये लहान मुलांना 9 रोगांपासून संरक्षण देण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या लसीकरण कार्यक्रमांमध्ये सिरम तर्फे 50 कोटी डोसेस पुरविले जातील. या 9 रोगांमध्ये गोवर,रूबेला,मेंदूज्वर,अतिसार,घटसर्प,डांग्या खोकला,धनुर्वात, ब-कावीळ व हिब यांचा समावेश आहे.आतापर्यंत 50 वर्षांत सिरम तर्फे विविध लसींचे 18 अब्जाहून जास्त डोसेस पुरविण्यात आले आहेत आणि त्यामुळे 25 दशलक्ष मुलांचे प्राण वाचले आहेत.हा पुरस्कार अबुधाबी येथे पार पडलेल्या गावीच्या एका सोहळ्यात देण्यात आला.हा सोहळा गावीच्या प्रगतीचा आढावा व त्याचा जगातील सर्वांत गरीब देशांवर होणारा प्रभाव यासाठी आयोजित केलेल्या उच्च स्तरीय परिषदेचा एक भाग होता.2018 अखेर पर्यंत गावी तर्फे 700 दशलक्ष लोकांचे लसीकरण करण्यात येणार असून त्यामुळे 10 दशलक्ष मृत्यु रोखण्यात यश मिळविले असेल.परिणामी जगातील 5 वर्षांखालील मुलांच्या मृत्युदराचे प्रमाण कमी करण्यात मदत होईल
Leave a Reply