केडीसीसीत अध्यक्ष व संचालकांचा सत्कार राज्यात नंबर वन: ५७ कोटींचा उच्चांकी नफा

 

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ व सर्व संचालकांचा सत्कार अधिकारी व कर्मचार्‍यांच्यावतीने झाला. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात बँकेने ५७ कोटी ढोबळ व ४४ कोटी इतका राज्यात उच्चांकी निव्वळ नफा मिळविला आहे. बँकेच्या या यशाबद्दल संचालक मंडळाचा सत्कार झाला.याबाबत अधिक माहिती अशी, सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक्स असोशियन लि.मुंबईने राज्यातील सर्वच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची आर्थिक स्थिती जाहीर केलेली आहे. यामध्ये केडीसीसी बँकेचा नफा राज्यात सर्वात जास्त असल्याचे नमूद केले आहे. त्याबाबत आज संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सर्व ग्राहक,ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, सभासद संस्था, शेतकरी, दोन्ही कर्मचारी संघटना , कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव संचालक मंडळाच्या सभेत मांडण्यात आला.

यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ म्हणाले,सहा वर्षाची प्रशासकाची कारकीर्द जाऊन मे २०१५ मध्ये म्हणजेच साडेतीन वर्षांपूर्वी विद्यमान संचालक मंडळ सत्तेत आले. त्यावेळी बँकेचा संचित तोटा १०३ कोटी रुपयांचा होता. ही सर्व परिस्थिती मागे टाकत ३१ मार्च २०१८ अखेर बँकेने ५७ कोटीचा ढोबळ नफा व ४४ कोटींचा निव्वळ नफा मिळविला. बँकेच्या १९२ शाखांपैकी १८२ शाखा नफ्यात आहेत. यामध्ये सर्वच घटकांचे योगदान असलेची कृतज्ञता श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.

ते पुढे म्हणाले, ३१ मार्च २०१९ अखेरचे म्हणजेच चालू आर्थिक वर्ष सर्वच बँकांसाठी आव्हानात्मक वर्ष असल्याचे सांगतानाच श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, सर्वात जास्त प्रमाणात कर्जपुरवठा हा साखर कारखानदारीला झालेला आहे. साखर कारखानदारी अडचणीत आलेली आहे. कारखाने चालू होऊन दीड महिना झाले तरी अद्यापही उसाची बिले निघालेले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारची कोणतेही अनुदान कारखान्यांना मिळालेले नाही. बँकेने शेतीसाठीही फार मोठा कर्ज पुरवठा केलेला आहे. दरम्यान राजस्थान , मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुकांनंतर कर्जमाफी हा मुद्दा फारच कळीचा ठरलेला आहे. या कर्जमाफीचा प्रसार झाल्यामुळे त्याचा परिणामही वसुलीवर झालेला आहे. केंद्र सरकारने याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा. त्यामुळे बँकांच्या वसुलीला गती येईल. त्याशिवाय दौलत साखर कारखाना (न्युट्रीयन्स कंपनी), बदलून न मिळालेल्या २५ कोटींच्या जुन्या नोटा याबाबतचे निर्णयही अजून झालेले नाही. या सर्व आव्हानांना तोंड देत बँक यशस्वी झाली तर यातून आपण शंभर कोटीच्या नफ्याकडे वाटचाल करू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!