कोल्हापूर.: वैद्यकीय व्यवसायातील महत्वाची जबाबदारी असणाऱ्या विविध सेवा घटकांना (पॅरा मेडिकल) प्रथमच साईशक्ती मेडिकल फौंडेशनच्या वतीने साईशक्ती आरोग्य सेवा गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या यशस्वी वाटचालीत तितकेच योगदान असणाऱ्या विविध घटकाची याद्वारे प्रथमच नोंद घेतली जाणार आहे.
किमान पाच वर्षाहून अधिक वैद्यकीय क्षेत्रातील भूलतज्ञ, ऑपरेशन थियटर असिस्टंट, नर्स-ब्रदर, मेट्रेन लॅब-असिस्टंट, वॉर्ड बॉय, अॅम्ब्युलेन्स ड्रायव्हर तसेच शासकीय वैद्यकीय क्षेत्रातील आशावर्कर, ए एन एम प्रयोगशाळा सहाय्यक या कायम व कंत्राटी पदावर कार्यरत व्यक्तीच्या कार्याची साईशक्ती आरोग्य सेवा गौरव पुरस्काराने यथायोग्य नोंद घेतली जाणार आहे.
यासह विनाशासकीय सेवाभावी संस्था आणि विविध उद्योग संस्थांच्या सामाजिक दायित्व निधी (सी एस आर फंड) अंतर्गत अनुकरणीय काम करणाऱ्या प्रकल्पाची हा विशेष नोंद घेत त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित व्यक्ती संस्थांनी आपली माहिती साईशक्ती मेडिकल फौंडेशन, तिसरा मजला, मातोश्री प्लाझा, व्हिनस कॉर्नर, कोल्हापूर-416001 इ-मेल saishaktifoundation@gmail.com येथे सविस्तरपणे पाठवावी. तसेच रुग्णसेवेचा अनुभव घेतलेली रुग्ण नातेवाईक हे सुद्धा यासाठी माहिती देऊन यासाठी शिफारस करू शकतात.
याच बरोबरीने राज्य शासनाच्या महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना (पूर्वीची राजीव गांधी जन आरोग्य योजना) मधून प्रत्यक्ष लाभ घेतलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी या योजनेतील अनुकूल-प्रतिकूल अनुभव व ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी योग्य सूचना आपल्या तपशीलासह पाठवावेत. या सूचना आणि अनुभवाची एकत्रित नोंद घेऊन तुलनात्मक अहवाल शासनाच्या संबंधित अधिकारी वर्गास सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी सविस्तर माहिती पाठवावी. असे आवाहन समन्वय साईशक्ती मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष धीरज रुकडे, व जनसंपर्क समन्वयक राजेंद्र मकोटे यांनी केले आहे.
Leave a Reply