
कोल्हापूर : महिलांच्या प्रश्नांकडे गांभीर्यांने सामाजिक भान जागरूक ठेवून पाहिले पाहिजे. यासाठी समाजाने प्रथमत: आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या डॉ.श्रीमती.क्रांती जेजुरकर यांनी केले.शिवाजी विद्यापीठाच्या बेटी बचाव अभियानांतर्गत जागतिक महिला दिनाचे आयोजन भाषा भवन सभागृहामध्ये करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.जेजुरकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर उपस्थित होते. यावेळी, कोल्हापूर सामाजिक कल्याण संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिमा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ.जेजुरकर पुढे म्हणाल्या, महिलांनी सर्व क्षेत्रामध्ये वर्चस्व मिळविलेले आहे त्यामुळे मुलगी नको ही भूमिका अमान्य झाली पाहिजे. उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून समाजामध्ये प्रगल्भता निर्माण करणे आवश्यक आहे. समाजाचे भवितव्य तरूण पिढीवर अवलंबून आहे या माध्यमातून त्यांना सक्षम करणे आवश्यक आहे.प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रतिमा पाटील म्हणाल्या, बेटी बचाव अभियानाअंतर्गत तीन्ही जिल्हयांमध्ये समाज जागृती करण्याचे मोठे कार्य विद्यापीठाने केलेले आहे. आजच्या युगामध्ये ज्या व्यक्तीकडे उत्तम ज्ञान आहे तोच श्रेष्ठ मानला जाणार आहे, त्यामुळे ज्ञानार्जन करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. काळाची गरज ओळखून महिलांनी सक्षम होणे निकडीचे आहे. जागृक स्त्रीमुळे घर, कुटुंब आणि समाज सक्षम होतो.अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर म्हणाले, महिलांच्या सक्षमीकरणामध्ये सावित्रीबाई फुले यांचे कार्य अतिशय महान आहे. शैक्षणिक तसेच सेवा क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर स्त्री-पुरूषांचे प्रमाण समान होण्यासाठी पुढील शंभर वर्षे लागणार आहेत, असे एका अहवालावरून स्पष्ट होते. त्यामुळे स्त्री-पुरूष असा भेदाभेद न करता तंत्रज्ञानाच्या युगामध्ये उत्तम पिढी घडेल याकडे जाणीवपूर्वक पहावे.यावेळी बेटी बचाव अभियानामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे महाविद्यालये, पथनाटय सादरीकरणारे संघ यांना पारितोषके प्रदान करण्यात आली. तद्नंतर, लघुनाटीका आणि पोवाडा विनायक लोहार यांच्या संघाने सादर केले. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपटयाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले.समन्वयक डॉ.प्रतिभा देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.एन.व्ही.वाळवेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही.टी.पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ.आर.व्ही.गुरव, विकास मस्के, बेटी बचाव अभियानाच्या ब्रैंड ॲम्बॅसिडर श्रीमती तेरा उस्मान खान यांचेसह विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, सामाजिक कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
Leave a Reply