
कोल्हापूर: कोल्हापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच रिजनल कनेक्टीव्हीटी सर्व्हिसमध्ये कोल्हापूर विमानतळाचा समावेश झाला आणि उडान योजनेअंतर्गत विविध ठिकाणी हवाई सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. उडान फेज टू अंतर्गत, १ नोहेंबर पासून कोल्हापूरहून हैद्राबाद आणि बेंगलोरसाठी विमान उड्डान घेत आहेत. त्याचबरोबर उडान फेज- ३ अंतर्गत कोल्हापूर- मुंबई आणि कोल्हापूर – तिरूपती हे मार्ग मंजुर झाले आहेत. त्यापैकी कोल्हापूर – तिरूपतीसाठी १२ मे २०१९ पासून हवाई सेवा सुरू होत आहे. इंडीगो एअर लाईन या प्रख्यात कंपनीकडून ही सेवा दिली जाणार आहे. त्यासाठी आजपासून तिकीट बुकींग सुरू झाले आहे. ऑनलाईन आणि विमानतळावरील कंपनीच्या काऊंटरवर तिकीट उपलब्ध झाले आहे. ही सेवा दररोज दिली जाणार असून, कोल्हापूरातून तिरूपतीसाठी सकाळी ९.४५ वाजता विमान टेकऑफ करेल. तर तिरूपतीहून कोल्हापूरसाठी विमान दुपारी १२.०० वाजता उडान करणार आहे. हे एटीआर विमान असून, त्याची आसन क्षमता ७२ इतकी आहे. भाविकांची जुनी मागणी यानिमित्तानं पूर्ण होणार असून, याचे समाधान असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. उडानच्या फेज टू आणि फेज थ्री मुळं कोल्हापूर शहर देशाच्या हवाई नकाशावर ठळक होईल आणि त्यातून जिल्हयाचा सर्वांगीण विकास होईल. दरम्यान कोल्हापूर- हैद्राबाद हे विमान दुपारी २.३० मिनिटांनी उडान घेणार आहे. तसंच हैद्राबादहून कोल्हापूरसाठी निघणारे विमान सकाळी ८ वाजता टेकऑफ घेणार आहे.
कोल्हापूर- तिरूपती विमान सेवेमुळं भाविकांची मोठी सोय होणार असून, एका दिवसात तिरूपती बालाजीचे दर्शन घेवून येता येणार आहे. लवकरच दररोजची कोल्हापूर- मुंबई विमान सेवा सुरू होणार आहे.
Leave a Reply