जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्यापलीकडील प्रेमकथा :‘पिरेम’ !

 
तरुणाई म्हटलं की ओघाने प्रेम हे आलंच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी सारखीच असते. प्रेम ही भावनाच इतकी तीव्र असते की त्यापुढे जात, धर्म, पत, प्रतिष्ठा ई. ना स्थान नसते. प्रेमापुढे सामाजिक, आर्थिक पातळीसुद्धा विरून जातात. तसेच प्रेम म्हटलं की रुसवे-फुगवे, धूसफूस व हलकी भांडणं सुद्धा ओघाने आलीच. कधी कधी या लहानश्या रुसव्या- फुगव्यांच रूपांतर ‘ब्रेक-अप’ मध्ये सुद्धा होते. अशाच शक्य-अशक्यतांचा विचार करून निर्माते विश्वजित पाटील यांनी ‘पिरेम’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करावयाचे ठरविले असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद विश्वजित पाटील आणि रामभाऊ यांनी लिहिले आहेत.
‘पिरेम’ ह्या नावावरून कल्पना आलीच असेल की कथा ग्रामीण भागातील आहे. ही कहाणी एका गावातील गरीब घरातील अत्यंत हुशार मुलाची आहे, जो गावात उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे दहावीनंतर शहरातील कॉलेजात शिकायला जातो. तिथे त्याच्या आयुष्यात प्रेमांकुर फुलतो परंतु तो एका विचित्र प्रसंगात गुरफटून जातो. याचं चित्रण अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने दिग्दर्शक प्रदीप लायकर यांनी ‘पिरेम’ या चित्रपटातून मांडले आहे. 
‘पिरेम’ या चित्रपटातून एक फ्रेश नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विश्वजीत पाटील आणि दिव्या सुभाष. त्यांच्यासोबत मानिनी दुर्गे , विठ्ठल खलसे, सागर खुर्द यांसारखी तगडी कलाकार मंडळी सोबतीला आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संभाजीराव बाळासाहेब पाटील (शिव छत्रपती पुरस्कार विजेते ), तेलगु टायटन्सचे प्रशिक्षक  डॉ.रमेश भेन्दिगिरी (दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते 1996),  विठ्ठल पाटील सर, डॉ.अण्णासाहेब गावडे,  आणि युवराज पाटील यांच्या हस्ते थाटामाटात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!