
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता आज पासून लागू झाली आहे. जिल्ह्यातील दहाही मतदार संघामध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील आदी उपस्थित होते. निवडणूक खर्च मर्यादा 28 लाख रुपये असून खुल्या प्रवर्गासाठी 10 हजार रुपये तर अनुसूचित जाती जमाती उमेदवारांना 5 हजार रुपये अनामत रक्कम आहे, असे सांगून जिल्हाधिकारी देसाई पुढे म्हणाले, उमेदवारांना लागणाऱ्या सर्व परवानग्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे एक खिडकी योजनेतून देण्यात येणार आहेत. आदर्श आचारसंहिता संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी सी व्हीजील ही प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीवरुन कोणताही नागरिक किंवा मतदार ऑनलाईन पध्दतीने तक्रार दाखल करु शकतो. जिल्ह्याच्या हद्दीवरील 14 ठिकाणी रँडम पध्दतीने वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी विविध पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.विविध पक्षांचे फलक, होर्डिंगवरील मजकूर उतरविण्यात यावा, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी म्हणाले, प्रशासनातर्फे उतरविणे, झाकून ठेवणे अशी कार्यवाही सुरु आहे. परवानगी न घेता प्रचार केल्यास कारवाई करण्यात येईल. समाज माध्यमांवरील प्रचारासाठीही परवानगीची आवश्यकता आहे. आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे अन्यथा गुन्हे दाखल करु, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Leave a Reply