
कोल्हापूर: हिंदी चित्रपट सृष्टीचे महान गायक स्वर्गीय किशोर कुमार यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘शॅडो ऑफ किशोरदा’ या किशोर कुमार यांनी गायलेल्या गीतांचा भावस्पर्शी व सुरेल संगीत सोहळा 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे सादर होणार आहे. या कार्यक्रमात किशोर कुमार यांची तब्बल 18 गीते रसिकांसाठी गायली जाणार आहेत, अशी माहिती राहुल देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूरचे सुपुत्र राहुल देसाई हे उत्तम क्रिकेटपटू होते परंतु गेली तीन वर्षे त्यांनी मृत्यूशी झुंज देत आपल्या जबर इच्छाशक्तीने त्यावर मात करत पुन्हा त्यांनी आपल्या आयुष्याला एक संधी दिली. क्रिकेटबरोबरच त्यांना कलेची आवड होती. स्वर्गीय किशोर कुमार यांना ते आपले गुरू मानतात. म्हणूनच त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. या कार्यक्रमातून संकलित होणारा निधी सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे. पत्रकार परिषदेला ऐश्वर्या देसाई, शोभना जाधव-भोसले, डॉ. अंजली पाटील, ममता गद्रे, सुलक्षणा निंबाळकर, अर्पणा पाटील, संजय पाठारे आदी उपस्थित होते.
Leave a Reply