
कोल्हापूर / प्रतिनिधी: फेडरल बँक ही बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या बँकेच्यावतीने कोल्हापूर जिल्हातील पूरग्रस्त गावांना तीन कोटी रुपयांची मदत करणार आहे. कोल्हापूरमधील बस्तवाड आणि राजापूरवाडी या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी तसेच आवश्यक त्या घटकांचा व गरजांचा संपूर्ण विचार करून सर्वसमावेशक उपाययोजना करण्यात येणार आहे. या गावांचा त्वरित आणि दीर्घकालीन विकास होण्यासाठी फेडरल बँकेने ही पावले उचलली आहेत. ही योजना फेब्रुवारी 2020 च्या अखेरीस पूर्ण करण्याचा बँकेचा मानस आहे, अशी माहिती फेडरल बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख नंदकुमार व्ही यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या गावातील कुटुंबे, संस्था आणि शाळांसाठी उपयुक्त अशा उपक्रमांचा या योजनेमध्ये समावेश केला गेला आहे. पूरग्रस्त गावातील कुटुंबांच्या घरांचे नुकसान झाले आहे अशा लोकांसाठी पहिल्या टप्प्यात एकूण शंभर पक्की घरे बांधण्यात येणार आहेत. तसेच या गावातील शाळांच्या पुनर्बांधणीसाठी बँकेकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शाळामध्ये बेंचेस, टेबल, संगणक, प्रोजेक्टर इत्यादींनी सुसज्ज केल्या जाणार आहेत.याचबरोबर दुभती जनावरे आणि कुटीर उद्योगांसाठी यंत्रे देण्याचे प्रायोजकत्व बँकेने स्वीकारले आहे. पायाभूत सुविधांमध्ये आरओ वॉटर प्युरिफायर, घंटागाडी, सौरऊर्जा पत्रे आणि प्रथम उपचार इत्यादी सुविधांचा या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय पाचशे झाडे लावून बँक आपली सामाजिक बांधिलकी जोपासणार आहे. अनेक सामाजिक विषयांमध्ये बँक मनापासून उत्सुकता दाखवत असते. आजवर हजारो योजनांमार्फत बँकेने सामाजिक उपक्रमांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरवर आलेल्या पुराच्या संकटावर मात देण्यासाठी फेडरल बँकेचा हा महत्त्वाचा वाटा आहे, असे मुंबई क्षेत्राचे प्रमुख दीपक गोविंद आणि बँकेचे उपाध्यक्ष व कोल्हापूर प्रादेशिक प्रमुख अजित देशपांडे यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असलेल्या इतर राज्यांमध्येही बँकेने अशाच प्रकारच्या पुनर्विकास उपक्रमांचे कार्य हाती घेतले आहे असेही ते म्हणाले.
Leave a Reply