
* ‘गर्ल्स’ चित्रपटाबद्दल काय सांगाल?
:मुलींच्या बंदिस्त आणि वेगळ्या अशा एका विश्वावर भाष्य करणारा सिनेमा म्हणजे ‘गर्ल्स’. मुली त्यांच्या जवळच्या मैत्रिणींसोबत असतांना अतिशय बिनधास्त असतात. कशाचीही पर्वा न करता त्या मजा मस्ती करतात. अशाच मैत्रिणींसोबत जर त्या एकट्या एखाद्या ट्रिपला गेल्या तर तिथे घडणारी मजा मस्ती तिथे गेल्यावर नव्यानेच प्रत्येकीची स्वतःशी आणि इतरांशी होणारी ओळख या सर्वांचे मिश्रण म्हणजे ‘गर्ल्स’. हा चित्रपट पाहिल्यावर अजून जास्त गोष्टी प्रेक्षकांना समजतील.
*’बॉईज’ आणि ‘बॉईज २’ नंतर ‘गर्ल्स’ सिनेमा कसा सुचला?
: खरंतर मुलांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट येऊन गेले आहेत किंबहुना येतात. मग ते हिंदीत असो किंवा मराठीत. मुलांचे जग सगळ्यांना माहीतच असते. ‘बॉईज’ चित्रपट करत असतानाच मला ही कल्पना सुचली. मुलींच्या अनोख्या विश्वापासून सर्व अनभिज्ञ असतात. मग मुलींचे हे बंदिस्त आणि आगळे वेगळे जग सर्वांसमोर आले पाहिजे. त्यांची मजा, त्यांचे विचार सर्वाना समजले पाहिजे या विचाराने मला झपाटून टाकले. माझा हा विचार मी आमच्या लेखकांना म्हणजेच हृषीकेश कोळी यांना सांगितलं. त्यांनी देखील सकारात्मक उत्तर दिले आणि मी या चित्रपटावर काम सुरु केले. तो दिवस होता आणि आजचा दिवस आहे. खूप आनंद होतोय की माझी संकल्पना मोठ्या पडद्यावर दिसत आहे.
*’बॉइज’ आणि ‘गर्ल्स’ हे दोन्ही चित्रपट करताना काय फरक जाणवला?
:’बॉइज’ आणि ‘गर्ल्स’ हे दोन्ही चित्रपट करताना मला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली ती म्हणजे, आपण किंवा आपला समाज मुलींना आजपर्यंत गृहीत धरत आला आहे. ‘काळजी’ या शब्दाचा आधार घेत कमी जास्त प्रमाणात मुलींच्या बाबतीत दुजाभाव देखील केला जातो. मात्र हा सिनेमा करताना मला समजले की, मुली खूप संवेदनशील आणि हुशार असतात. त्यांना आपल्या भावना, आपली काळजी समजत असते शिवाय आई-वडिलांवर त्यांचे अपार प्रेम असल्यामुळे आई वडील दुखावले जातील असे त्या वागत नाही.
* या चित्रपटात नवीन चेहऱ्यानं संधी द्यावी असे का वाटले?
: या तिन्ही मुलींची निवड ऑडिशन मधून झाली आहे. खरं पाहिले तर अन्विता आणि केतकी यांनी बऱ्यापैकी काम केले आहे. अन्विताने मराठी चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये काम केले आहे, तर केतकी काही शॉर्टफिल्म्स आणि दाक्षिणात्य मध्ये दिसली आहे. मात्र अंकिता पूर्णतः नवीन आहे. मला अशा तीन मुली पाहिजे होत्या ज्यांची पाटी कोरी असेल जेणेकरून मला त्या पाटीवर पाहिजे तसे चित्र काढता येईल. त्यामुळेच आणि नव्या प्रतिभेला संधी मिळेल या उद्देशाने मी नवीन चेहऱ्यांना घेतले आहे.
*आधीचे दोन्ही चित्रपट हिट झाल्याने, जबाबदारी वाढली आहे का?
: हो नक्कीच. एखाद्या दिग्दर्शकाचा एक चित्रपट हिट झाला तर त्या दिग्दर्शकाच्या दुसऱ्या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या असतात आणि, दोन्ही सिनेमांमध्ये तुलना केली जाते. हे खूप साहजिक आहे. त्यामुळे माझ्यावरची आता जबाबदारी खूप वाढली आहे. एक सांगतो मी कधीच चित्रपट हिट व्हावा याला प्राधान्य देत नाही. मी माझ्या कडे असलेला विषय किंवा माझी कथा चित्रपटामार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो. यश आणि अपयश हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. अपयश हे आपल्याला जमिनीवर राहायला मदत करत.
* अजून कोणत्या प्रकारचे सिनेमे दिग्दर्शित करायला आवडतील?
: प्रत्येक प्रकारचा चित्रपट दिग्दर्शित करतांना दिग्दर्शकाला त्याचा चित्रपटाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागतो. त्यासाठी एकाच पद्धतीने विचार करून चालत नाही. मला सुद्धा एक दिग्दर्शक म्हणून सर्व प्रकाचे चित्रपट करायचे आहे. मला एका चौकटीत अडकून न राहता सगळ्या स्वरूपाच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करायला आवडेल. मात्र संधी मिळालीच तर मी सर्वात आधी हॉरर कॉमेडी चित्रपट करेल. शिवाय ॲक्शन चित्रपटसुद्धा मला करायला आवडेल.
*कोणत्या कलाकाराला दिग्दर्शित करायला आवडेल आणि का?
: हा प्रश्न कोणत्याही दिग्दर्शकाला मग तो हिंदी, मराठी, तेलगू, कन्नड किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेत काम करणाऱ्याला विचारला, तरी त्याचे उत्तर एकच असेल आणि ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन. मला अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करायची संधी मिळावी यासाठी मी खूप प्रयत्नशील आहे. कमी वेळासाठी पण मला त्यांच्या सोबत काम करायचे आहे.
*भविष्यात तुमचा वेबसिरीज, मालिका, नाटक दिग्दर्शित करण्याचा विचार आहे का?
:मला वेबसिरीज करायला नक्कीच आवडेल. मला स्वतःला मालिका आवडत नाही. त्यामुळे मला मालिका दिग्दर्शित करण्यात रस नाही आणि, मी एखादे नाटक दिग्दर्शित करावे एवढी माझी पोहोच नाही, मी तेवढा मोठा सुद्धा नाही. नाटक म्हणजे अभिनयाचे विद्यापीठ आहे. त्यामुळे मी अजून स्वतःला तेवढा मुरलेला दिग्दर्शक समजत नाही.
* तुम्हाला अभिनय करायला आवडेल का?
: मुळात अभिनय माझा पिंड नाही. कॉलेजला असताना नाटक काम केले पण बॅक स्टेजला. अभिनय करायचा म्हणून मी या क्षेत्रांत नाही आलो. दोन तीन चित्रपटात मी अगदी छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत. मात्र त्यापेक्षा जास्त अभिनय मी नाही करू शकणार.
* येणाऱ्या प्रोजेक्ट्स बद्दल काय सांगाल?
:आता सध्या तरी पूर्ण लक्ष ‘गर्ल्स’वर केंद्रित आहे. पुढच्यावर्षी आम्ही बॉइज ३ घेऊन येणार आहोत.
Leave a Reply