
अवंतिका’, ‘अवघाची हा संसार’, ‘वादळवाट’ या गाजलेल्या मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री श्वेता शिंदे काही वर्षांपूर्वी अभिनयाकडून मालिका निर्मिती क्षेत्राकडे वळल्या. त्यांनी झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ लागीर झालं जी’ आणि सध्या सुरु असलेली ‘मिसेस मुख्यमंत्री’ ह्या मालिकांची यशस्वी रित्या निर्मिती केली. मात्र आता श्वेता यांनी आपली अभिनयाची आवड जोपासण्यासाठी लवकरच छोट्या पडद्यावर परतणार आहेत. सध्या त्या कोणत्या भूमिकेत दिसणार आहे हे जरी गुलदस्त्यात असले तरी झी युवा वाहिनीवर नवीन येणाऱ्या एका मालिकेत ही उत्कृष्ट अभिनेत्री तिची अदाकारी प्रेक्षकांना दाखवणार आहे. पुन्हा त्या आणि जय मल्हार फेम देवदत्त नागे झी युवा वर नवीन येणाऱ्या एका मालिकेत एकत्र काम करताना दिसणार आहेत.श्वेता यांना त्यांच्या भूमिकेबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की “ही भूमिका, एका कॉलेजच्या डीनची आहे. एक वेगळ्या प्रकारची लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मी ‘झी’मध्येच लहानाची मोठी झाले असं म्हणता येईल. आज बऱ्याच वर्षांनंतर मी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर काम करणार आहे. याची मनात थोडीशी धाकधूक आहेच, पण ‘झी’च्याच प्लॅटफॉर्मवरून पुनरागमन करत असल्याने आनंद सुद्धा खूप झालेला आहे.
मालिकेचं नाव ‘डॉक्टर डॉन’ असलं, तरी या मालिकेचं स्वरूप मात्र विनोदी असणार आहे. पौराणिक मालिकेत खंडेरायाच्या भूमिकेत दिसलेले देवदत्त नागे हे या मालिकेत थेट डॉनच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. एका डॉनचं आयुष्य, त्याच्या भोवतालची परिस्थिती, जवळच्या माणसांशी त्याचे असलेले संबंध, त्यांच्यासोबत राहण्यासाठी त्याला करावी लागणारी धडपड यावर ही मालिका आधारित असणार आहे. अभिनेता देवदत्त नागे या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
“विनोदी प्रकारात मी कधीच काम केलेलं नाही. त्यामुळे या रोलसाठी मला विचारलं याचा आनंद झाला होता. या मालिकेत मला डॉनचं काम करावं लागणार आहे. त्यातच एक विनोदी छटा सुद्धा जपावी लागणार आहे. त्यामुळेच माझ्यासाठी ही भूमिका खूपच आव्हानात्मक असणार आहे. मला नवनवीन प्रकारच्या भूमिकांचं आव्हान पेलायला खूप आवडतं. माझ्या इतर भूमिकांवर चाहत्यांनी जसं भरभरून प्रेम केलं तसंच याही भूमिकेला प्रेम मिळेल अशी माझी इच्छा आहे.”
Leave a Reply