
प्रयोगशील नाट्यसंस्था ‘अस्तित्व’तर्फे निर्मित समीक्षक आणि प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत असलेलं नाटक ‘लोकोमोशन’ आणि वेगळ्या वाटेवरचा प्रयोग म्हणून गौरवलेला ‘सुंदरी’ नाट्यप्रयोग यंदाच्या प्रतिष्ठेच्या काळाघोडा महोत्सवातले दोन महत्वाचे मराठी नाट्य प्रयोग आहेत. सजीव स्थिर होते, ते चालायला लागणे हि मानवी इतिहास आणि उत्क्रांतीतील महत्वाची घटना होती. अनेक सजीवांना चालण्याकरीता काही ना काही अवयव मिळाला, ह्या चलन शक्ती मुळे संरक्षण सोपे झाले , अन्न मिळवण्याच्या एकूण प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाला, जीवनाला गती आली , संपूर्ण विश्वाने हालचाल अनुभवली , स्पर्धेला मूर्त स्वरूप आले, आणि विकसित माणसाच्या ह्या जगात ”लोकोमोट’ होणे म्हणजे येणे जाणे , फिरणे , व्यवहारी भाषेत अप डाऊन करणे ह्या सगळ्या संज्ञा प्रचलीत झाल्या. पण इतकी गती असूनही माणसं अडकून पडली असतील तर ? याचा चक्रावून टाकणारा विचार करायला लावणारा नाट्यप्रयोग म्हणून अस्तित्व निर्मित,मिती चार,कल्याण कल्याण प्रस्तुत ‘लोकोमोशन’ सध्या चर्चेत आहे. युवा पिढीतला महत्वाचा नाटककार स्वप्नील चव्हाण आणि ज्येष्ठ दिग्दर्शक रवींद्र लाखे यांच्या या नाट्य प्रयोगाचे ‘अनुभवून पाहावा असा विचारगर्भ नाट्यप्रयोग’ अश्या शब्दात नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी कौतुक केले आहे.अस्तित्व – ईनाट्यशोध प्रस्तुत जिराफ थिएटर्स निर्मित ‘सुंदरी’ हे नाटक रंगभूमीवर सातत्याने वेगळे प्रयोग करणारा राकेश जाधव या युवा लेखक –दिग्दर्शक सादर करतो आहे. अनेक पारितोषिक प्राप्त भाग्य नायर आणि केदार देसाई अभिनित हा नाट्यप्रयोग त्यातला सकस आशय,उत्तम अभिनय आणि प्रकाशयोजनेचा वेगळा प्रयोग म्हणून चर्चेत आहे.येत्या पाच फेब्रुवारीला संध्याकाळी साडेचार वाजता सुंदरी आणि रात्री सात वाजता लोकोमोशनचा प्रयोग,नॅशनल गॅलरी ऑफ़ मॉर्डन आर्ट ,सर कावसजी जहाँगीर पब्लिक हॉल,एम्.जी रोड,काळाघोडा इथे होईल.
Leave a Reply