
कोल्हापूर: अंकशास्त्र याचा उपयोग करून आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक आरोग्यविषयक, वैवाहिक, व्यावसायिक सर्व समस्यांवर मार्ग काढले जातात असा अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांनी केलेला दावा खरा असेल तर आम्ही त्यांना वरील समस्या असणारी शंभर माणसे देतो त्यांच्या अंक शास्त्राचा वापर करून त्यांनी संबंधित लोकांच्या समस्या
सोडवाव्यात असे आवाहन प्राध्यापक व ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत एन.डी पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. अंकशास्त्रच्या मदतीने नि:संतांना मुले होतात हा दावा करणे आणि कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण नसताना आरोग्यविषयक समस्येसाठी उपाय आहे असे सांगणे हे अवैज्ञानिक व बेकायदेशीर आहे. फक्त स्पेलिंग बदलून अपत्य होणे अथवा न होणे हे शक्य नाही हा फसवा अवैज्ञानिक दावा आहे, आणि गंभीर गुन्हाही आहे. श्वेता जुमानी यांनी त्यांच्या जाहिरातीत तानाजी या चित्रपटाचा देखील उल्लेख केला आहे. तानाजी हे महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासातील एक पराक्रमी आणि सन्मान जनक व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या शौर्यावर आधारित चित्रपट गाजवण्यासाठी शास्त्राची मदत घ्यावी लागते असे म्हणणे म्हणजे तो केवळ संबंधित कलाकार आणि दिग्दर्शक यांचा अवमान नसून नरवीर तानाजी मालुसरे यांचा आणि त्यांच्या पराक्रमाचा ही अवमान आहे. याबद्दल जुमानी यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कोल्हापूर हे राजर्षी शाहू महाराजांचे व त्यांच्या पुरोगामी विचारांचे शहर आहे शाहूराजांनी ज्योतिषाला तुला स्वतःचे भविष्य कळत नाही तर तू इतरांचे भविष्य काय सांगणार? असा केलेला सवाल सर्वांना परिचित आहे. शाहुराजांच्या भूमीवर अवैज्ञानिक दावे करणारे कार्यक्रम आम्ही सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने रोखू असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेस अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव संजय बनसोडे, सुजाता म्हेत्रे, प्रकाश भोईटे, सुनील स्वामी, अनिल चव्हाण, दिलीप कांबळे यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply