
कोल्हापूर : इन्शुरन्सच्या बनावट पावत्या देऊन सर्वसामान्य रिक्षा व्यवसायिकांची लूट केल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरटीओ कार्यालयातील दलाल व यामध्ये सहभागी असणार्या रिक्षा संघटनेचा पदाधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शहर शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे लेखी निवेदन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना देण्यात आले. शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिलेल्या या निवेदनात म्हंटले आहे की, इन्शुरन्स पावती असल्याखेरीज वाहनांचे पासिंग करता येत नाही असा नियम आहे. अलीकडे काही रिक्षाचालकांनी इन्शुरन्सच्या बनावट पावत्या कागदपत्रांसोबत जोडल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या बनावट पावत्या देणारी आणि कागदपत्रे तयार करणारी एक यंत्रणा संक्रीय आहे. यामध्ये आरटीओ कार्यालयातील युनूस मोमिन, साजिद हे दलाल तर आरटीओ कार्यालयातील अनुप नामक व्यक्तीचा सहभाग आहे. त्याचबरोबर या टोळीचा सुत्रधार राजेंद्र शंकर जाधव हा सहभागी असल्याचा आरोपही या पत्रकात करण्यात आलाय. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्वसामान्य रिक्षाचालकांची लुबाडणूक करून, बनावट इन्शुरन्स पावत्या देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या मागणीचे लेखी निवेदन आज पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना देण्यात आले. डॉ देशमुख यांनी या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले, दीपक गौड, किशोर घाडगे, तुकाराम साळुंखे, सुनील जाधव, रणजित जाधव, रमेश खाडे, अमित चव्हाण, रघुनाथ टिपुगडे, विशाल देवकुळे, गजानन भुर्के, दीपक चव्हाण, सुनील भोसले, अंकुश निपाणीकर, सुशील भांदिगरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply