
नेहमीच आपल्या चित्रपटांमधून विनोदी अंगाने सामाजिक संदेश देणारे दिग्दर्शक समीर पाटील ‘विकून टाक’ सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘पोश्टर बॉईज’, ‘पोश्टर गर्ल’ सारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर समीर पाटील ‘विकून टाक’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. चित्रपटाचे पोस्टर, टिझर बघून थोडीफार कल्पना आलीच असेल, की या चित्रपटातही काहीतरी धमाकेदार पाहायला मिळणार. ‘विकून टाक’ या सिनेमाचा ट्रेलर आणि चित्रपटातील ‘दादाचं लगीन’, ‘डोळ्यामंदी तुझा चांदवा’ या दोन गाण्यांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच काळाने मराठी सिनेसृष्टीत मोठा विनोदी चित्रपट प्रदर्शित होत असून. चंकी पांडेसारखा नावाजलेला बॉलिवूड कलाकार या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीमध्ये पदार्पण करत आहे.
ग्रामीण भागात घडणाऱ्या या कथेतल्या ‘मुकुंद तोरांबे’ या गावातील हॅण्डसम तरुणाभोवती फिरते. सर्वसामान्य आयुष्य जगत असतानाच त्याच्या आयुष्यात काही घटना घडतात आणि, त्यातच अधिक भर म्हणून त्याच्या आयुष्यात एक अनपेक्षित पाहुणा येतो. हा दुबईहून आलेला पाहुणा मुकुंदला का शोधतोय? मुकुंद आणि त्या अरब शेखचे काय कनेक्शन? आणि या सगळयात गावकऱ्यांच्या मनात उपस्थित झालेल्या शंका, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे चित्रपट आल्यावरच कळतील.मुळात एखादा सामाजिक विषय हलक्याफुलक्या, विनोदी पद्धतीने मांडला तर तो प्रेक्षकांना अधिक भावतो, असे मानणाऱ्या समीर पाटील यांनी ‘विकून टाक’द्वारेही काहीतरी प्रबोधनात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात हा संदेश कोणता, हे जाणून घेण्यासाठी मात्र १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
Leave a Reply