
कोल्हापूर /प्रतिनिधी: श्री शिवाजी महाराजांना या अत्यंत निष्ठावान आणि पराक्रम सवंगड्यांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सुरुवातीपासून मोलाची साथ दिली.त्यातील एक म्हणजे तानाजी मालुसरे. नरवीर तानाजी मालुसरे पुण्ययात्रेचे आयोजन मैत्रेय प्रतिष्ठानच्यावतीने १४ ते १७ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले होते. यापुढे यात्रेमध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांची संजीवन पालखी नेण्यात आली होती. ही पालखी सिंहगड ते उमरठ या ऐतिहासिक मार्गावरून नेण्यात आली. तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांचे तेरावे वंशज अनिल मालुसरे, सुभाष मालुसरे, शिवराम मालुसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पालखी उमरठ या गावी जिथे नरवीर यांची समाधी आजही इतिहासाची प्रेरणा देते, याठिकाणी नेऊन या पुण्ययात्रेची समाप्ती करण्यात आली, अशी माहिती मैत्रेय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व इतिहास प्रेमी डॉ.अमर अडके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
४ फेब्रुवारी १६७० साली सिंहगड म्हणजेच कोंढाण्याची लढाई तानाजी मालुसरे यांनी पराक्रमाने जिंकली. परंतु या लढाईत लढता लढता त्यांना वीरमरण आले. त्यानंतर या वीरयोद्धाचा देह सिंहगडावरून सन्मानपूर्वक पालखित अधिष्ठित करून राजगड पायथा, तोरणा असे मावळातून केळदकडा मार्गे कोकणात उमरठ येथे नेण्यात आला. साडेतीनशे वर्षानंतर याचे पुन्हा स्मरण व्हावे यासाठी या पुण्ययात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या देशाला या पुण्य यात्रेच्या भागाचा भूगोल समजावा आणि ते पुढे प्रेरणास्त्रोत म्हणावे यासाठी हा प्रयत्न केला होता असे हे डॉ. अडके यांनी सांगितले. महाराष्ट्रातून या यात्रेत १०० हून अधिक इतिहासप्रेमी सहभागी झाले होते. तर कोल्हापूर मधून ३८ लोक या पुण्ययात्रेत सहभागी झाले होते. एकूण सव्वीस तास ही पुण्ययात्रा पूर्ण करण्यासाठी लागले. या पुण्ययात्रेचा प्रवास चित्रफितीद्वारे यावेळी दाखविण्यात आला.याची संपूर्ण चित्रफीत १६ मार्च रोजी शाहू स्मारक भवन येथे संध्याकाळी सहा वाजता दाखविण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष डॉ. विश्वनाथ भोसले, राजेश पाटील, सुचित हिरेमठ, शिवप्रसाद स्वामी यांच्यासह इतिहास प्रेमी उपस्थित होते.
Leave a Reply