
कोल्हापूर:केंद्र सरकार कडून जनधन खाते असलेल्या महिलांना पाचशे रुपये देण्यात येत आहेत. पण कोल्हापुर जिल्हयात १२ लाख पन्नास हजार महिलांची विविध प्रकारची बँक खाती आहेत. या संकट समयी सरसकट सर्व महिला खातेधारकांना पाचशे रुपये देण्यात यावेत. तसेच, जिल्ह्यातील तसेच राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतील २ हजार रुपये अद्याप मिळालेले नाहीत. याबाबत काँग्रेस पक्षाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या समन्वयातून महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते, मंत्री व पदाधिकारी यांच्या सोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. यावेळी झालेल्या चर्चेत सतेज पाटील यांनी ही मागणी केली. राजस्थान येथील कोटा येथे कोल्हापूरसह महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या घरी पोहचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे, पण केंद्र शासनाकडून याबाबत मदत करण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घ्यावा. कोरोनाच्या संदर्भात केंद्राकडून महाराष्ट्राला वेळेत आणि योग्य निर्देश मिळत नाहीत. ही बाब पक्षाने केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून द्यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI, सेवादल आणि महिला काँग्रेस तसेच पक्षाचे जिल्ह्यातील सर्व आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या तर्फे सुरु असलेल्या मदत कार्याबद्दल ना. पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा संपर्क मंत्री या नात्याने तीनही जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष आणि पदधिकारी यांच्याशी संपर्क करून कोरोनाबाबत माहिती घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करत असून तिथेही काँग्रेसच्या माध्यमातून चांगल्याप्रकारे मदत कार्य सुरु आहे. असेही ना. पाटील यांनी या चर्चेत दरम्यान स्पष्ट केले.
Leave a Reply