कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिकांना दहा हजारांची मदत द्या:आ.ऋतुराज पाटील आणि आ.चंद्रकांत जाधव 

 

कोल्हापूर:कोरोनाच्या संकटकाळात गेली महिनाभर अधिक काळ रिक्षा व्यवसाय बंद आहे. यामुळे हातावर पोट असणारे रिक्षाचालक पुरते हबकून गेले आहेत . त्यामुळे राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिकांना 10 हजार रुपये मदत घ्यावी तसेच कर्जाच्या महिन्याच्या हप्त्यातही सवलत मिळावी , अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सद्या देशात कोरोना विषाणु (कोविड-१९) ची राष्ट्रीय आपत्ती आलेली आहे. त्यासाठी प्रतिबंधक उपाय योजना राबविणेत येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना या विषाणूंचा संसर्ग व संक्रमण प्रतिबंधक उपाय योजना पर्यवेक्षण व नियंत्रणाचे काम युध्दपातळीवर चालु आहे.या मध्ये जीवनावश्यक सेवा सुरळीत सुरू आहेत .
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात जवळपास 10 हजार रिक्षा व्यावसायिक आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील या रिक्षा व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज रिक्षा फिरती राहिली तरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. दररोजच्या कमाईतूनच महिन्याचा हप्ता, गाडीची देखभाल दुरुस्ती, महिन्याचा किराणा आणि मुलांचे शिक्षण होत असते. मात्र सद्या लॉकडाउनमुळे गेली महिनाभर व्यवसायच ठप्प झाल्याने रिक्षाचालक-मालक अडचणीत आले आहेत. दररोज मिळणारी रक्कम बंद झाली आहे. त्यामुळे जीवन जगायचे कसे? तसेच गाडीचा हप्ता कसा भरायचा? हा प्रश्नही त्यांच्यासमोर आहे. लॉकडावून नंतर नेमके अर्थचक्र कसे चालणार याबरोबर आपल्या भविष्याची चिंता या रिक्षा व्यावसायिकांना लागून राहिली आहे . महाराष्ट्र सरकारने रिक्षा व्यावसायिकांना 10 हजार रुपये द्यावेत, कर्जाच्या महिन्याच्या हप्त्यातही सवलत मिळावी अशी रिक्षा व्यावसायिकांकडून मागणी होत आहे.तरी कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिकांच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यांना 10 हजार आर्थिक मदतीबरोबरच कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदत मिळणेसाठी शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही करुन सहकार्य करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!