
कोल्हापूर :दुकाने उघडण्याचे नियोजन करून सामाजिक अंतरानुसार ती सुरू करावीत, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज आयुक्तांना केली.लॉकडाउनचा दुसऱ्या टप्प्यानंतर शासनाने काही नियमांची अंमलबजावणी करून उद्योग-व्यापार सुरू करण्यास परवानगी दिली आहे मात्र शहरातील काही भागातील दुकाने सुरू करण्यास अडचण येत आहे. त्या दृष्टीने गेल्या दोन दिवसांपासून आमदार चंद्रकात जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे आणि संलग्न संघटना प्रशासनाबरोबर बैठका घेऊन मार्ग काढीत आहेत. त्यासाठी आज पदाधिकाऱ्यांनी आज आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याबरोबर दुकाने सुरू करण्यासंदर्भात बैठक घेतली.
यावेळी आमदार जाधव यांनी सांगितले की, शहरात दुकाने लागून लागून आहेत अशावेळी ती कशी उघडता येतील, याचे नियोजन करा. कारण अजून लॉकडाउन १७ तारखेपर्यंत आहे आणि याच कालावधीत आपणाला मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागणार आहे. आजच सवलत दिलेल्या पहिल्या दिवशी अगदी अनिर्बंध पद्धतीने लोक घराबाहेर पडले आहेत. असेच जर लोक वागत असतील तर पुन्हा लॉकडाऊनचे नियम कडक करावे लागतील.
यावेळी चेंबरचे अध्यक्ष श्री. शेटे, उपाध्यक्ष संजय पाटील, शिवाजीराव पोवार, सचिव धनंजय दुग्गे, माजी अध्यक्ष प्रदीप कापडिया, आनंद माने, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, अजित कोठारी, जयेश ओसवाल, तौफिक मुल्लाणी आदीनी चर्चेत भाग घेतला.दरम्यान, पाच पाच दुकाने सोडून की सम-विषम यानुसार दुकाने सुरू करावीत, याचे नियोजन उद्या करू व त्यानुसार उद्योग-व्यापार सुरू होईल, असे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले.
Leave a Reply