
कोल्हापूर: येथील सेंट झेव्हिअर्स हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सीपीआर तसेच महापालिका रुग्णालयास सुमारे अडीच लाखाचे कोरोना प्रतिबंधक साहित्य ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आज सुपूर्द केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, युवराज पाटील आदि उपस्थित होते. सेंट झेव्हिअर्स हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून कोरोना विरुध्दच्या लढ्यातील आरोग्य योध्यांसाठी मोलाची मदत केली असल्याचे गौरवोद्गार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
कोरोना विरूध्दच्या लढाईत आरोग्य अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे अडीच लाखाचे कोरोना प्रतिबंधक साहित्य देण्यात आले, यामध्ये सीपीआर हॉस्पिटलच्या कोरोना विभागास 5 बेड सेट, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल व पंचगंगा हॉस्पिटल येथील वैद्यकीय स्टाफकरिता 300 फेस शिल्डचा समावेश आहे. याबरोबरच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 5 हजार फेस मास्क, 400 फेस शिल्ड व 2 हजार हॅण्ड ग्लोव्हज, शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडील पोलीस बांधवांसाठी 100 फेस शिल्ड, 1 हजार फेस मास्क व गरजू व्यक्तिंना 100 अन्नधान्याची पाकिटे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.
Leave a Reply