
कोल्हापूर : सध्यस्थितीत जगभरात कोरोना साथीने थैमान घातले आहे. कोरोना रोगाचा फैलाव थांबविण्याकरिता केंद्र शासनाने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर केले असल्याने, देशभरात संपूर्ण व्यवहार ठप्प आहेत. यामुळे मजूर, नोकरदार, व्यावसायिक. व्यापारी अशा सर्वच वर्गाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यातून सर्वच नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र शासन, रिझर्व बँक तसेच राज्य शासनाच्या निर्देशानुसार विविध बँकांनी कर्जदारांना हप्ते भरण्यासाठी सवलत देऊ केली आहे. पण, शासन निर्देश डावलून कोल्हापूर जिल्ह्यातील फायनान्स कंपन्याकडून कर्जदारांकडून कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीकरिता तगादा सुरु आहे. सदर सक्तीची वसुली तातडीने थांबवावी. रिझर्व बँकेचे निर्देश डावलणाऱ्या खाजगी फायनान्स कंपन्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी. आम.राजेश क्षीरसागर यांनी आज जिल्हाधिकारी श्री.दौलत देसाई यांना दिले. शासनाच्या निर्देशानुसार कर्जाचा हप्ता भरण्यास तीन महिन्यांची मुभा असताना कर्जदारांकडे फायनान्स कंपन्याकडून कर्जाचे हप्ते भरण्यास दबाव आणला जात आहे. कर्जदारांना फोन करणे, घरी जावून धमकावण्याचेही प्रकार घडले आहेत. त्यातच पहिल्या पेंडीग हप्त्यासाठी सुमारे २४ टक्के व्याज आणि दुसऱ्या पेंडीग हप्त्यासाठी ४८ टक्के व्याज प्रलंबित रक्कमेवर आकारण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. एकीकडे विविध बँकांनी कर्जदारांना हप्ते भरण्यासाठी सवलत देवू केली आहे. मात्र शहरातील फायनान्स कंपन्या मात्र कर्जदारांना कोणत्याही प्रकारची सवलत न देता, कर्जाचे हप्ते वेळेवर भरा अन्यथा जबरी दंडव्याज आकारणीला सामोरे जा अशा प्रकारे धमकावत आहेत. तुटपुंजे उत्पन्न असणारे अनेकजण विविध कारणांसाठी कर्ज घेतात. अशावेळी कर्जाचे हप्ते भरण्यासाठी बहुतांश बँकांनी कर्जदारांना सवलत देवून थोडाफार दिलासा दिला आहे. मात्र, खाजगी फायनान्स कंपन्या कोणताही मुलाहिजा न ठेवता पठाणी व्याजदराने हप्ते वसुली करताना दिसत आहेत. दरमहा हप्ता न भरल्यास तब्बल २४ ते ४८ टक्के व्याज आकारण्याची धमकी देवून बळजबरीने हप्ते वसूल करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याप्रकरणी शासनाने गांभीर्याने लक्ष घालून फायनान्स कंपन्याकडून होणाऱ्या हप्ते वसुलीस तीन महिन्यांची मुभा आणि योग्य व्याजदराप्रमाणे पुढील हप्ते जमा करून घेण्याचे आदेश देवून कर्जदारांची आर्थिक लुबाडनुक थांबवावी, अन्यथा शिवसेनेशी गाठ असल्याचा इशाराही माजी आम.राजेश क्षीरसागर यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
Leave a Reply