
कोल्हापूर: देवस्थान समितीच्या वतीने आज शहरातील वारांगनांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.यामध्ये तांदूळ, गहू, तुरडाळ, साखर, तेल, चटणी, साबण अश्या चौदा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
समाजातील कोणताही घटक उपाशी राहू नये, यासाठी देवस्थान समिती या घटकांच्या पाठिशी कायम ठाम उभी राहील. ही मदत नाही तर आमचे कर्तव्य आहे.आजपर्यंत नेहमीच देवस्थान समितीने समाजातील गरीब, गरजू व वंचित लोकांना मदतीचा हात दिलेला आहे. कोरोना या महामारी मुळे समाजातील अनेक घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अश्या वेळी आई अंबाबाईची कृपा असलेल्या या कोल्हापूरमध्ये कोणी उपाशी राहू नये हीच देवीची इच्छा असते.लॉक डाऊन सुरू झाल्यापासून छोटे व्यावसायिक, रिक्षा व्यावसायिक, आणि गरजू लोकांना टप्याटप्याने मदत देणे सुरू आहे. शहरातील वारांगना हा ही गरजू घटक आहे, हे लक्षात घेऊन त्यांना मदत करणे हे कर्तव्य समजून देवस्थान समिती मदत करत आहे, असे मनोगत देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी व्यक्त केले.
कोणतेही सामाजिक कार्य करताना राजकारण न करता खरोखरच ते गरजू लोकांपर्यंत पोहचावे हाच उद्देश ठेऊन आतापर्यंत हे मदत कार्य देवस्थान समिती करत आहे. या पुढेही अजून अनेक घटकांपर्यंत ही मदत पोहचवली जाणार असल्याचे सदस्य राजेंद्र जाधव यांनी सांगितले. आई अंबाबाईला भक्तांनी भरभरून दिलेले आहे पण आज लोकांची गरज लक्षात घेता ही मदत आई अंबाबाईचा प्रसाद समजून स्विकारावा असे सदस्य शिवाजी जाधव यांनी सांगितले.असंख्य वारंगनांनी याचा लाभ घेतला. सचिव विजय पोवार, मिलिंद घेवारी, सुयश पाटील,उमेश निरंकारी व देवस्थान समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply