
कोल्हापूर:लघु व मध्यम उद्योगांना कर्जे देण्यापेक्षा थेट आर्थिक साह्य करावे, जेणेकरून मध्यम वर्गातील लोकांच्या हातात पैसे जातील, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज केली.सोशल मीडियावर काँग्रेसच्या वतीने देशव्यापी स्पीकअप इंडिया या नावे काँग्रेसच्या वतीने राबविण्यात आलेल्या कँपेनमध्ये श्री. जाधव यांनी ही प्रमुख मागणी केली.
पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांबरोबर श्री. जाधव यांनी स्थानिक घटकांच्या मागण्या मांडून त्यांना उभारी देण्याचे काम केले.यामध्ये मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या अशा – देशातील गरीब कुटुंबाला १० हजार रुपये हस्तांतरित केले जावेत. पक्षाने सुचवलेल्या न्याय योजनेला धरून पुढील सहा महिन्यांसाठी त्यांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला ७५०० जमा करावेत. लघु व मध्यम उद्योगांना कर्जे देण्यापेक्षा थेट आर्थिक सहाय्य करावे, जेणेकरून मध्यम वर्गातील लोकांच्या हातात पैसे जातील. याचबरोबर स्थानिक स्तरावरील मागण्यांमध्ये रिक्षावाले, हातावर पोट असणार्यांना आर्थिक मदत देण्यात यावी. ज्यांचे रेशनकार्ड नाही त्यांना आधार कार्डच्या माध्यमातून अस्थायी रेशनकार्ड देऊन त्यांना धान्य देण्यात यावे. वीज बिल स्थिर आकार स्थगितीसाठी कायमस्वरूपी योजना राबवण्यात यावी.
श्री. जाधव यांनी वरील मागण्या मांडण्याबरोबरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघामध्ये केलेल्या कामांचा आढावाही यावेळी घेतला त्यामध्ये संपूर्ण मतदारसंघात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता फवारणी करून स्वछता मोहीम राबवण्यात आली. सीपीआर रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचार्यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. स्वयंसेवी संस्था, कोरोना रक्षक आणि सरकारी कर्मचार्यांना हँडग्लोज, मास्क व सॅनिटाझर देण्यात आले.
मतदारसंघातील गोरगरीब, गरजू लोकांना धान्य वाटप करण्यात आले. रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली. सरकारी हॉस्पिटलकरिता मशिनरी देण्यात आल्या. याचबरोबर बाहेरून येणार्या लोकांचे नियोजन करून मतदारसंघात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सुयोग्य असे नियोजन केले. त्यांना व सर्वच नागरिकांना कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करून त्यांची प्रतिकारक्षमता वाढवण्याचे प्रयत्न केले. लॉकडाऊनमुळे समाजातील सर्वच घटकांचे आर्थिक स्त्रोत बंद झाले होते त्यांना एक छोटीसी मदत म्हणून रेशनकार्ड, रिक्षावाले, गरजू लोकांना धान्य वाटप केले.
Leave a Reply