
कोल्हापूर:महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. त्यांना मी मौनंम सर्वार्थ साधनम्, मौनव्रताने मनाची शांती लाभते आणि प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय अशी तीन पुस्तके भेट म्हणून पाठविणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. गडहिंग्लजमध्ये पत्रकार परिषदेत श्री. मुश्रीफ बोलत होते.यावेळी मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले , माजी मुख्यमंत्री असल्यामुळे ते सिनिअर झालेले आहेत. परंतु झालंय काय की गेल्या पाच वर्षात ते मुख्यमंत्री असल्यामुळे हम करे सो कायदा असा त्यांचा कारभार होता. त्या पाच वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक लोकांना फोडून त्यांनी स्वतःच्या पक्षात घेतले. स्वतःच्या पक्षातीलच अनेकांना त्यांनी घरचा रस्ता दाखवला, असे अनेक कार्यक्रम केले. परंतु, अशा काळात ते ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्याचं मला आश्चर्यच वाटतंय.
मुख्यमंत्रीपदाच्या त्या पाच वर्षांमध्ये त्यांना नाही म्हणणारा कोणी सापडलाच नाही, त्यामुळे आता त्याना हे सगळं सहन होईना झालंय.श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाचं काम अतिशय चांगलं सुरू आहे. त्यामुळे. श्री फडणवीस यांनी थोडं शांत राहावं आणि सरकार काय करतय बघत राहावं.महाराष्ट्रात करोनाच्या रूपाने महाभयंकर संकट उभे आहे. अशातच विरोधकांकडून यातही राजकारण सुरू आहे . राजकारण आरोप-प्रत्यारोपांनी टीका-टिप्पणी करत बसण्यापेक्षा सकारात्मक सूचना करा सहकार्य करा, मिळून काम करूया .अमेरिकेतील मृतांचा आकडा तर एक लाखाच्या वर गेला आहे तिथले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रडतील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका, चीन, फ्रान्स, ईटली ही प्रगत राष्ट्र सुद्धा औषध आणि लस मिळवण्याच्या मागे लागून अक्षरशा घायकुतीला आली आहेत.दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. मी त्यांच्याबद्दल बोललो की लोकांना वाटतं की हे कसे काय बोलतात ? परंतु ते आणि मी एकाच वेळी विधानसभेत आलो. पहिल्या तीन टर्ममध्ये मी मंत्री होतो, ते विरोधी पक्षाचे आमदार होते. श्री फडणवीस अत्यंत हुशार आहेत. नंतर चौथ्या टर्ममध्ये एकदम मुख्यमंत्रीच झाले. त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात गेलो. या पाचव्या टर्ममध्ये आम्ही मंत्री झालो आणि ते विरोधी पक्षनेते झाले.
Leave a Reply