
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याच्या आसपास शाळा सुरु होण्याचे संकेत शासनाकडून येत आहेत. त्याकरिता प्रवेश प्रक्रिया सध्या बहुतांश शाळांमध्ये सुरु आहे. कोरोना काळात समाजातील सर्वच घटकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. याबाबत अतिरिक्त फी, डोनेशन घेवू नये, असे सक्त आदेश राज्य शासनाने दिले आहेत. परंतु मनमानी कारभार करणाऱ्या ठराविक शाळा दरवर्षी शासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखवून, अवाजवी फी, डोनेशन, बिल्डींग फंड आकारतात. अशा नियमबाह्य काम करणाऱ्या शाळांना शिवसेना वेळोवेळी योग्य धडा शिकवून पालक आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देत आली आहे. यावर्षी कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत माणसांचे जगणे मुश्कील झाले असून, विध्यार्थी आणि पालकांची लुट कराल, तर शिक्षणसम्राटांची शिवसेनेशी गाठ असेल, असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या विविध प्रश्नासंदर्भात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांची भेट घेवून पालकांची लुट करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
Leave a Reply