
कोल्हापूर : ‘लॉकडाउन’मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या वाजंत्री व्यवसायास शासनाने मदत करावी, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज केली. कोल्हापूर जिल्हा घडशी समाज संघाने आमदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना या आशयाचे निवेदन दिले.लग्नसोहळा, गणपती, मोहरम या सणांमध्ये वाद्ये वाजवून वाजंत्री आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे विवाह सोहळ्यांबरोबर इतर धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आले. लग्नसराईत मुख्य आकर्षण ठरणाऱ्या वाजंत्री व्यावसायिकांचा यावर्षीचा हंगाम बुडाला आहे. आर्थिक स्त्रोतच बंद झाल्याने कुटुंबाचा चरितार्थ चालवावा कसा, असा प्रश्न या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या अनेकांसमोर आहे. जिल्ह्यात अशी 500 तर शहरात 200 कुटुंबे आहेत. त्यामुळे वाजंत्री व्यवसाय करणाऱ्या घडशी समाजाला आर्थिक मदत द्यावी, वीज व पाणी बिल माफ करावे, सरकारी नियोजनाप्रमाणे धान्य मिळावे, ओबीसी प्रवर्गातून एक ते वीस लाखांपर्यंत कर्जे उपलब्ध व्हावी, तसेच सामाजिक अंतराचे पालन करून कार्यक्रमात वाद्ये वादनास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी राज्य कार्याध्यक्ष शिवाजी कदम, सुनील धुमाळ, प्रकाश गायकवाड, दिनकर मोरे, दत्तात्रय मोहिते, शिवाजी कदम, महेश कदम, दत्तात्रय मोहिते, चंदन मोहिते, अरुण भोसले, राजू साळोखे, शुभम भोसले, निलेश साळोखे आदी उपस्थित होते.दरम्यान, वाजंत्री व्यावसायिकांच्या या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करण्याच्या मागणीबरोबर पोलिस दल, मिलिट्रीमध्ये या व्यवसायातील युवा पिढीला निकषाप्रमाणे नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही जाधव यांनी यावेळी दिले.
Leave a Reply