आजपासून रात्री ९ वाजता पौराणिक मालिका ‘रामायण’ मराठीतून फक्त स्टार प्रवाहवर

 

मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपत घराघरात पोहोचलेली स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांसाठी एक अनोखा नजराणा घेऊन येणार आहे. रामानंद सागर निर्मित रामायण ही पौराणिक मालिका पहिल्यांदाच मराठी भाषेतून स्टार प्रवाहवर पहाता येणार आहे. या पौराणिक मालिकेची जादू इतक्या वर्षांनंतर तसूभरही कमी झालेली नाही. आजही प्रेक्षकांना ही मालिका तितकाच आनंद देते. रामायण ही फक्त मालिकाच नाही तर हा मनामनात रुजलेला संस्कार आहे. अलौकिक निष्ठा, पवित्र प्रेम, आणि असामान्य श्रद्धेची गोष्ट पहिल्यांदाच मराठीतून अनुभवायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी असेल. ही महामालिका ११ जूनपासून रात्री ९ वाजता भेटीला येणार आहे.

याविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘इतकी महान कथा, संस्कार शिकवणारी, आयुष्य घडवणारी मालिका पहिल्यांदाच स्टार प्रवाहवर येतेय याचा आनंद आणि अभिमान आहे. आपल्या भाषेतले प्रभुराम , सीतामाता, लक्ष्मण, हनुमान कसे दिसतील? आणि कसे वाटतील? हे पाहायला नक्की आवडेल. माझी खात्री आहे मायबोली मराठीमध्येही ही मालिका तितकीच प्रभावी ठरेल.’

या महामालिकेत अभिनेता स्वप्नील जोशीने देखिल महत्वाची भूमिका साकारली होती. स्टार प्रवाहवर मराठीतून सुरू होणाऱ्या रामयणाबद्दल सांगताना स्वप्नील म्हणाला, ‘रामायण साधारण 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं. तेव्हापासून ते जितके वेळा ज्या ज्या चॅनेलवर दाखवलं गेलं तेव्हा फक्त मराष्ट्रातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांना या मालिकेने भुरळ घातली. त्यामुळे स्टार प्रवाहचं खूप खूप अभिनंदन की, रामायण आता मराठीतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मला खूप आनंद आणि अभिमान आहे की मी या मालिकेचा एक भाग होतो. मी कुश साकारला होता. आता हे सगळं आपल्या मातृभाषेत अनुभवायला मिळणार याचा आनंद वेगळाच आहे. प्रभू रामचंद्रांची कृपा आपल्या सर्वांवर राहो हीच प्रार्थना.तेव्हा पाहायला विसरू नका मनामनात संस्कार घडवणारी  मालिका रामायण पहिल्यांदाच मायबोली मराठीत. ११ जूनपासून रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!