
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर सत्ताकारण व राजकारण कसे बदलले, यावर आधारीत ‘35 डेज : हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्र चेंज्ड फोरएव्हर’ हे नवे पुस्तक ‘एबीपी न्यूज’चे पश्चिम भारताचे संपादक जितेंद्र दीक्षित यांनी लिहिले आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर 35 दिवसांमध्ये महाराष्ट्रात उत्कंठापूर्ण राजकीय नाट्य घडले आणि अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले. या काळातील या घडामोडी व पडद्यामागील राजकारण यांचा मागोवा दीक्षित यांनी या पुस्तकात घेतला आहे.महाराष्ट्रात या 35 दिवसांमध्ये घडलेल्या घटनांकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. दूरचित्रवाणीवर त्या दररोज रंजकतेने पाहिल्या जात होत्या. त्यांचे इतिवृत्त व विश्लेषण दीक्षित यांनी या पुस्तकातून वाचकांपुढे मांडले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ उद्धव ठाकरे यांनी घेण्यात या राजकीय घडामोडींची परिणती झाली. ठाकरे घराण्यातील एखाद्या व्यक्तीने शासकीय पद सांभाळण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.
महाराष्ट्रातील त्या 35 दिवसांमधील घडामोडींमुळे राजकीय पंडितही गोंधळून गेले होते. राजकीय पक्ष त्यावेळी अभूतपूर्व व अनाकलनीय निर्णय कसे घेत होते आणि त्यातून महाराष्ट्रात स्थिर सरकार कसे स्थापन झाले, याची कथा या पुस्तकात लिहिण्यात आली आहे.कालचे मित्र आज शत्रू कसे बनले, आधीच्या शत्रुंचे रुपांतर नंतर मित्रांमध्ये कसे झाले, राजकीय तत्वज्ञान हे अनावश्यक व कालबाह्य कसे ठरू लागले आणि सत्तेची हाव ही इतर सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाची कशी ठरली, याचे ज्वलंत चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष व राजकीय नेते यांचे बुरखे या सर्व घटनांमुळे फाटले व राज्यातील राजकारण कायमचे बदलले.
Leave a Reply