
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेसला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा ठराव करून, राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली.
निवेदनातील माहिती अशी, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा आणि न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक व पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण सुरू करून मागासवर्गीय आणि दलितांची मानसिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी कसून प्रयत्न केले. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस सर्वांसाठी प्रेरणास्थळ आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ नव्या पिढीला समता, लोकशाही, आधुनिकता आणि विकास यांची सतत प्रेरणा देणारे आहे. कोल्हापूरला आधुनिकतेचा चेहरा मिळवून देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक उत्थान, कलाश्रय, स्वातंत्र्यलढय़ाला योगदान, राधानगरी धरणाची उभारणी, शाहू छत्रपती स्पिनिंग अॅण्ड विव्हिंग मिलची स्थापना, शाहूपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जाची सोय, असे विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले. या रयतेच्या राजाचा इतिहास, कर्तृत्व, कार्य आणि विचार लोकांसमोर येण्यासाठी जन्मस्थळाच्या विकासाचे काम प्रगतीपथावर आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी व त्यांच्या विचारांचा जागर देशभर करण्यासाठी कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेसला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी मंत्रिमंडळाची तत्काळ मंजुरी द्यावी आणि राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
Leave a Reply