
कागल :एक महिन्यापूर्वी कोरोनामुक्त झालेला कागल तालुक्यात दोन पॉझिटिव आढळल्याने नागरिकात चिंता पसरली आहे. त्यामुळे, खबरदारी घ्या अन्यथा विस्फोट होईल, अशी चिंता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. मास्कचा वापर, गर्दी टाळणे, सोशल डिस्टंसिंग, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता हाच यावर एकमेव उपाय आहे, असेही ते म्हणाले.कागलमध्ये डी आर माने महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित आढावा बैठकीत श्री. मुश्रीफ बोलत होते.यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले,दोन दिवसापूर्वी कागल शहरातील एक व मळगे बुद्रुक येथील एक असे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. लॉकडाउन –एक उठवल्यानंतर मुंबई, पुणेमधून लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले व ग्रामीण भागात हे प्रमाण वाढले. या महिन्याच्या अखेरीस हे प्रमाण अजूनही वाढण्याचा तज्ञांचा अंदाज असून विशेषता लहान मुले व म्हाताऱ्या माणसाना जास्त धोका आहे.श्री मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्रभरातील कोरोणाचा संसर्ग रोखण्यात ग्रामदक्षता समित्यांचे योगदान मोठे आहे. परंतु; अलीकडच्या काही दिवसात या समित्या थोड्या ढील्या पडल्याचे दिसून येते. ग्रामदक्षता समित्यांनी अजूनही कार्यक्षम बनून गावात येणाऱ्या प्रत्येकावर बारकाईने लक्ष ठेवून कुणाचीही भीड न ठेवता काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.या बैठकीला तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष जुवेकर आदी अधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply