
कोल्हापूर:कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या बँक खात्याला आधारकार्ड लिंक करावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे व्याज यापुढे थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खात्याला आधार लिंक करणे महत्त्वाचे असल्याचे, श्री माने यांनी म्हटले आहे. बँक खात्याला आधारकार्ड लिंक करण्याची ही अंतिम मुदत ३१ जुलै २०२० पर्यंत आहे.याबाबत अधिक माहिती अशी, यापूर्वी नियमित पिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून तीन टक्के व राज्य सरकारकडून तीन टक्के असा एकूण सहा टक्के व्याज परतावा मिळत होता. ही रक्कम केंद्र व राज्य सरकारांकडून जिल्हा बँकेकडे येऊन मग ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायची. यापुढे केंद्र सरकारकडून येणारी व्याज परताव्याची रक्कम ही थेट संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्याला आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांची ही खाती आधार लिंक न झाल्यास संबंधित शेतकरी व्याज परताव्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.आधारकार्ड लिंक करण्याची ही प्रक्रिया बँकेने याआधीच सुरू केलेली आहे. दरम्यान अद्यापही आधारकार्ड लिंक न केलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित शाखांशी संपर्क साधून लवकरात लवकर आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य आहे.
Leave a Reply