
कोल्हापूर: पारंपरिक कारागिरी पुढच्या पिढीपर्यंत पोहचली पाहिजे, असे मत जिल्हा परिषदेचे सहायक प्रकल्प संचालक सचिन पानारी यांनी आज व्यक्त केले.येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये हँडिक्राफ्ट विभागाच्या वतीने ज्वेलरी आणि लेटर क्राफ्ट बॅचेसच्या विद्यार्थ्यांना टूलकीट वाटप्रसंगी ते बोलत होते.श्री. पानारी म्हणाले, हँडिक्राफ्ट विभागाच्या वतीने आयोजित विविध प्रशिक्षण संधींचा लाभ घेऊन कारागिरी पुढच्या पिढीपर्यंत पोहचली पाहिजे. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही केले.हँडिक्राफ्टचे विभागीय संचालक चंद्रशेखर सिंग यांनी सांगितले की, या टूलमुळे आपल्या व्यवसायाची उत्पादकता वाढू शकेल. ज्वेलरी आणि लेदर या क्षेत्रातील प्रत्येकी 80 जणांना प्रशिक्षण देऊन त्यांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने टूलकीटचे वाटप करण्याचे नियोजन होते. मात्र कोरोनामुळे यावेळी सामाजिक अंतर राखत त्यातील 20 जणांना टूलकीट वितरण करीत आहोत तर इतरांना लवकरच देऊ. त्याचबरोबर त्यांनी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.समन्वयक शशांक मांडरे म्हणाले, आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे हँडिक्राफ्टच्या माध्यमातून ग्राहकाला हवी तशी वस्तू तुम्हाला देता येऊ शकेल. आजच्या स्थितीला प्रत्येकाचे घरातून काम निसर्गाला अनुरूप असल्याचे वाटते. आधार सामाजिक संस्थेच्या अपर्णा चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.हँडिक्राफ्ट विभागाचे रितेश यांनी स्वागत, प्रास्ताविक करून आभार मानले. यावेळी गौरव मनोहर, राजू भागोजी, अतिश चव्हाण यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
Leave a Reply